जम्मू काश्मीर येथे चकमकीत दोन दहशतवादी ठार
 महा त भा  15-Jul-2017जम्मू काश्मीर येथे लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. जम्मू काश्मीरच्या त्राल येथे सातोरा क्षेत्रात ही चकमक झाली.

भारतीय लष्कराला या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. याला लष्करातर्फे देखील चोख प्रत्यूत्तर देण्यात आले, आणि लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू काश्मीर येथे ये चकमकी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. त्यामुळे तेथील जवानांविषयी चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान एका सर्वेक्षणानुसार गेल्या सात महीन्यात जम्मू काश्मीर येथे लष्कराने १०२ दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे. गेल्या सात वर्षांमध्ये सर्वाधिक दहशतवाद्यांना याच वर्षी ठार करण्यात आले आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयब्बा, जैश-ए-मुहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. यामध्ये लश्कर ए तैयबाचा कमांडर बशीर लश्करी, अबु दुजाना आणि हिज्बुल मुजाहिदीनचा मुख्य दहशतवादी सब्जार अहमद भट यांचा देखील समावेश आहे.