समाजप्रिय व्यंगचित्रकार
 महा त भा  15-Jul-2017
 

 
 
मंगेश तेंडुलकर यांचे दि. ११ जुलै रोजी निधन झाले. शास्त्र शाखेच्या तेंडुलकरांनी पुण्याच्या खडकी येथील दारुगोळा (ऍम्युनेशन) कारखान्यात सुरुवातीला नोकरी केली. कदाचित त्यामुळेच की काय, परंतु त्यांच्या कुंचल्यातून निघणार्‍या रेषा या कधीकाळी दारुगोळ्याच्या वापरानंतर होणार्‍या परिणामांप्रमाणे भासायच्या. त्या कधीकधी दिवाळीतील शोभेच्या दारु पैकी फुलबाजी किंवा भुईनळ्यांप्रमाणे हास्य फुलांच्या लकेरी उडवून द्यायच्या.
 
कोल्हापूरला १९३४ साली जन्म झाल्यानंतर कौटुंबिक बदलाचा एक भाग म्हणून ते लहानपणीच पुण्याला आले. आरे स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण आणि पुढे बीएस्‌सी केल्यावर खडकीत ऍम्युनेशन फॅक्टरीत नोकरी...! परंतु, चाकरमान्यांप्रमाणे जीवन जगण्यात मनाचा आनंद मानणार्‍यांपैकी तेंडुलकर नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील आतल्या आवाजाला सल्ला विचारला. ‘कार्टून’ म्हणजे ‘व्यंगचित्र’ आणि ‘कॅरिकेचर’ म्हणजे ‘अर्कचित्र’ रेखाटण्याची त्यांना मुळात आवड असल्याने आणि लिखाणाची प्रतिभाशक्तीही घरातच वास करून असल्यामुळे त्यांनी त्यांचा आतला आवाज जाणला.
 
पद्मभूषण सिनेकथा लेखक, नाट्यकथा लेखक, ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे ते बंधू. साहित्य आणि कला यांचा वसा जपणारी ही दोन भावंडे. सामाजिक भान जपत सामाजिक बांधिलकीचे जणू रक्षणच करायचं त्यांनी ठरवलं असावं; नव्हे ते त्यांच्या जीवन जगण्यातील कटुसत्यच असावं. एरवी आपण पुण्यामध्ये कुठलीही आणि कितीही चाकांची गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी आपण ‘एकवेळ सर्कशीतल्या एक चाकाची सायकल चालविणेदेखील खूप सोप्पं’ असं म्हणू, असे पुण्याची ट्रॅफिक! अगदी आजही...!! मंगेश तेंडुलकरांनाही पुण्याच्या ट्रॅफिकबद्दल भारी चिंता होती. चिंता ही एकतर रागामुळे येते किंवा हतबलतेमुळे येते. तेंडुलकरांना या दोन्ही प्रकारांतून पुण्याच्या ट्रॅफिकची चिंता वाटत होती.
 
ओशो म्हणतात त्याप्रमाणे, कुठल्याही घात-अपघातांतून व्यक्तीला शिकायला मिळते अन् कलाकार विशेषतः ‘चित्रकथा’ या विषयाची आवड असणार्‍यास, तर अधिकच प्रभावी मार्ग सापडून त्याच्याकडून मोठं कार्य घडतं. मंगेश तेंडुलकरांच्या बाबतीत असंच झालं असावं. त्यांनी पुणे ट्रॅफिकवर अनेक प्रभावी अर्कचित्रे रेखाटली. त्यांच्या त्या अर्कचित्रांना पुणे ट्रॅफिक पोलिसांनी फारच उचलून धरलं. तोंडातील थुंकी संपूर्ण कोरड पडेपर्यंत घशातून हवा बाहेर काढून शिट्टी फुंकूनदेखील, ज्या पुणेरी ट्रॅफिकवर परिणाम होत नव्हता, तो परिणाम तेंडुलकरांच्या प्रभावी अर्कचित्रांमुळे पाहावयास मिळाला आणि पुढे याच घटनेनंतर त्यांनी ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून पुणेकरांकडून ‘ओळख’ मिळविली. पुणे ट्रॅफिक पोलिसांसाठी अर्थात पुण्यातील बेजबाबदार वाहने चालविणार्‍या वाहनचालकांसाठी तेंडुलकरांची अर्कचित्रे आणि पुढे पुढे त्यांची व्यंगचित्रे म्हणजे जणू ‘सुरक्षादूत’च ठरली होती. सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचं कर्वे रोडवर एक बसस्टॅण्ड डेव्हलप केला.
 
ब्रश आणि नंतर काळा स्केचपेन वा मार्कर याद्वारे त्यांची कार्टुन्स बोलायची. समाजातील विविध समस्या, समाजातील व्यंग, व्यक्ती, प्रसंग यावर त्यांची कुंचल्याची भाषा भाष्य करायची. त्यांनी ८९ व्यंगचित्रे प्रदर्शने ‘तेंडुलकर्स कार्टुन्स’ या नावाने भरविली. त्या प्रत्येक व्यंगचित्र प्रदर्शनात त्यांची नवीन ३० व्यंगचित्रे असायची. त्यांचे आवडते लेखक, चित्रकार, व्यक्ती अशा व्यक्तिमत्वांवरही त्यांनी अर्कचित्रे रेखाटली. पॉकेट कार्टून, कॅप्शनलेस कार्टून चितारायला त्यांना आवडायची. गेल्या २०-२२ वर्षांत म्हणजे ८३व्या वर्षी निधन झाले, त्या अगोदरच्या म्हणजे १९९६ पासून त्यांनी या विषयांकडे येण्याचे निश्चित केले.
 
चित्रांकनाचे वा कार्टुनिंगचे कुठलेही अधिकृत शिक्षण न घेतलेल्या तेंडुलकरांनी स्वतःची ‘व्यंगचित्रकार’ अशी स्पष्ट ओळख निर्माण केली. त्यांची व्यंगचित्रे पाहून अनेक नवीन व्यंगचित्रकार घडत गेले.
 
वयाच्या पन्नाशीनंतरच्या दशकात व्यंगचित्रांकडे वळून म्हणजे सुमारे साठाव्या वर्षांनंतर त्यांनी या क्षेत्रात उडी घेऊन काय-काय पादाक्रांत केले, हे नुसते पाहिले तरी थक्क व्हायला होईल...!!
 
‘कार्टून’, ‘भुईचक्र’, ‘संडे मूड’, ‘अतिक्रमण’, ‘कुणी पपंतो अजून काळोख’, ‘बित्तेशां?’-‘दांकेशां!’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली, तर ‘आवाज’, ‘छात्र प्रबोधन’, ‘श्रीदीपलक्ष्मी’, ‘ग्रहांकित’, ‘कुटुंब कौटुंबिक’, किस्त्रीम’ या आणि अशा अनेक दिवाळी अंकात २००३ पासून तेंडुलकरांनी कार्टुन्स दिली.
 
८३ वर्षांच्या काळातील अखेरची २०-२२ वर्षे ‘कार्टून’ आणि ‘कॅरिकेचर्स’सह लिखाण करणार्‍या या ज्येष्ठ आणि महान कलावंताची महानता खरी म्हणजे त्यांच्या अखेरच्या पाव पटीतील अर्थात ‘वन् फोर्थ’ आयुष्यातील सामाजिक कार्यातच आहे... त्यांच्या कुंचल्याच्या रुपाने समाज आणि कलाक्षेत्र त्यांना सदैव स्मरणात ठेवेल!!
 
- प्रा. गजानन शेपाळ