भारतातील पहिल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाडीचे लोकार्पण
 महा त भा  14-Jul-2017

 

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज भारतातील पहिल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाडीचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज दिल्ली येथे या सौर गाडीचे उद्घाटन करण्यात आले. या रेल्वे गाडीची क्षमता १६०० अश्वशक्ती एवढी असून ही गाडी डीझेलवर चालणार असली तरी देखील या गाडीतील पंखे, लाईट आणि डिस्प्ले हे सौर उर्जेवर चालणार आहेत.

 

ही गाडी सराय रोहिल्ला ते फरुक नगर या दरम्यान धावणार आहे. या गाडीच्या प्रत्येक डब्यावर १६ सौर पॅनल लावले गेले असून सौर उर्जा साठवून ठेवण्यासाठी १२० एच सौर बॅटरी लावली गेली आहे. या गाडीतील सर्व सुविधा या सौर उर्जेवर चालणाऱ्या असणार आहेत तर प्रत्येक वर्षी ही गाडी २० लाख रुपयांच्या डीझेलचा खर्च वाचवणार आहे.

 

ही गाडी पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. ९ टन सीओटू कमी तयार करेल ज्यामुळे डीझेलपासून तयार होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. ही गाडी इंधनमुक्त रेल्वे तयार करण्याला प्रोत्साहन देईल तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.