दुर्ग भ्रमंती – पेठचा किल्ला (कोथळी गड)
 महा त भा  14-Jul-2017

 

मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर कर्जत आणि लोणावळ्यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे जात असताना आपणास एक उंच सुळका दिसतो. हाच तो पेठचा किल्ला अर्थात कोथळी गड. सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याने गजबजलेल्या या प्रदेशात हा उंच सुळका सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आपण जसजसे भ्रमंती करत या सुळक्याच्या दिशेने जातो, तसतसे याचा आकार कधी महादेवाच्या पिंडीसारखा तर कधी मान वर करून सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या कासवासारखा दिसतो. पेठ गावाजवळ असल्यामुळे या किल्ल्यास “पेठचा किल्ला” असे म्हणतात. आणि कोथळी गडाच्या माथ्यावर मजबुतीसाठी गोल आकारात बांधकाम केलेले आहे. या बांधकामामुळे याला “कोथळीगड” असे म्हणतात. ( हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात.) कर्जतहून खेड - कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा आणि सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. प्रबळगड, नागफणी, माणिकगड, पिशाळगड आणि माथेरानचे पठार पर्यंतचा परिसर या किल्ल्यावरून दिसतो.

कर्जतहून एस. टी. बसने कशेळे गावमार्गे आंबिवली या गावात आल्यानंतर, आंबिवली गावातून गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ‘ हे गाव आहे. या गावातून गडाकडे जाणारी पायवाट आपल्याला गडाच्या पायथ्याशी घेवून जाते. ही वाट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते.

 

कोथळी गडाचा इतिहास :

कोथळीगडावर सद्यस्थितीत कुठलेही अवशेष नाहीत. आकाराने छोट्याश्या कासवासारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याचा इतिहास वेगळाच आहे. या इतिहासाची माहिती मुघल कागदपत्रांमधून मिळते. मराठेशाहीचे कोथळीगडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या शस्त्रागारास विशेष महत्त्व होते.

औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या ताब्यातील कोथळीगड घेण्यासाठी मुघल सैन्य पाठवले होते. कोथळीगडावर मराठ्यांचा शस्त्रागार आहे, हे समजताच औरंगजेबाने अब्दुल कादरला सैन्यासह कोथळीगडावर आक्रमण करण्यास पाठवले होते. मुघल सैन्याने मराठ्यांशी युद्ध करून कोथळी गड ताब्यात घेतला. आणि त्यावेळी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली, असे म्हटले जाते. दरम्यान झालेल्या लढाईमध्ये मराठ्यांच्या हातून हा महत्वाचा गड गेला होता. त्यामुळे गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु मराठ्यांच्या सैन्यास कोथळी गड ताब्यात घेता आला नाही. शेवटी कोथळी गड इ.स. १८१८ नंतर ब्रिटीश इंडिया कंपनीच्या अखत्यारीत आला.

 

कोथळी गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

पेठ गावाजवळचा निसर्गरम्य परिसर : आंबिवली गावामधून कोथळी गडाकडे जात असताना नागमोडी वाटा आहेत. या वाटांनी ज्या दिशेस कोथळी गडाचा सुळका दिसतो, त्या दिशेने जात असताना परिसरातील निसर्ग सौंदर्य आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेवून जाते. पक्षांचे आवाज, सर्वत्र हिरवळ, भात शेती, उंचच उंच झाडे आणि त्यामधून जाणारी पाऊल वाट. या निसर्ग रम्य वातावरणातून पुढे जात असताना वाटेवर धबधबा दिसतो. याठिकाणी वातावरण खूपच प्रसन्न असते. सतत वाहणारा वारा आणि समोर दिसणारा धबधबा पाहून, आपण पुढे जातो, तेंव्हा आपणास गड पायथ्याजवळ पोचता येते.

 

सुळका (कोथळी गड) : कोथळी गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावातून वर मान करून बसलेल्या कासवासारखा हा सुळका दिसतो. पावसाळ्यामध्ये या सुळक्याच्या दिशेने जात असताना परिसरातील धुके, सतत थांबून थांबून पडणारा पाऊस आणि थंडगार वारा यांचा अनुभव घेता येतो.

 

कोथळी गडाचा पायथा : गडाच्या पायथ्याशी कातळात कोरलेल्या गुहा आहेत. या गुहेमधुनच कोरलेल्या पायऱ्यांची वाट गडावर जाते. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायर्‍यांचे आणि प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. पायथ्याशी असलेल्या आणि छताला आधार देणाऱ्या खांबांवर नक्षीकाम करण्यात आलेले आहे.

 

देवीची गुहा : गडाच्या खाली पायथ्याशी देवीची गुहा आहे. या गुहेमध्ये एक मूर्ती आहे. तसेच या गुहेमध्ये देखील नक्षीकाम करण्यात आलेले आहे. या गुहेमध्ये मूर्तीच्या समोर काही घंटा आहेत. येथे एक पाण्याचे टाके देखील आहे.

 

भैरोबाची गुहा : या गुहेमध्ये गडाच्या खाली छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब आहेत. तसेच गुहेमध्ये काही जूने तोफेचे गोळे देखील आहेत. गुहेमध्ये भैरोबाची मूर्ती आहे. या गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या आहेत. पायर्‍यांच्या मार्गावर काही शिल्प कोरलेले आहे. पायर्‍यांच्या शेवटी गडावर पोचताच समोर दगडात कोरून काढलेला एक दरवाजा आहे.

 

पाण्याची टाकी : कोथळी गडाच्या माथ्यावर पोचल्यानंतर आपल्याला समोर दोन पाण्याची टाकी दिसतात. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरात नाहीत. या पाण्याच्या टाक्यापासून पुढे जात असताना आपणास काही छोट्या तोफा ठेवलेल्या दिसतात. या तोफांपासून पुढे गेल्यानंतर गड माथ्यावरील सपाट प्रदेश दिसतो.

 

कोथळी गडाचा गडमाथा : कोथळी गडावर यास गड म्हणावे असे कुठले ही अवशेष नाहीत. परंतु  गड माथ्यावरुन कलावंतीण दुर्ग, प्रबळगड, माथेरानचे पठार, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग आणि माणिकगड पर्यंतचा परिसर दिसतो. गडाच्या माथ्यावर पावसाळ्यात सतत धुके आणि पाऊस असतो. आपल्याला ढग शेजारून पुढे जात आहेत हे जाणवते. हा अनुभव खूपच सुखावह आहे.

कोथळी गड तसा गड नाही. केवळ एक सुळका आहे. परंतु या सुळक्यावर जाण्यासाठी कोरलेल्या पायऱ्या आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य आज ही आपणास आपल्या पुर्वजांच्या इतिहासाची साक्ष देते. त्यामुळे दुर्ग भ्रमंती करणाऱ्या किंवा सह्याद्रीच्या निसर्ग अनुभवण्यास इच्छुक असणाऱ्या दुर्ग प्रेमींनी कोथळी गडावर एकदा तरी जावे.

कोथळी गड आपणास नकळत राम गणेश गडकरी यांच्या या गाण्याची आठवण करून देतो,

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

 - नागेश कुलकर्णी