देणे मंगेशाचे..
 महा त भा  13-Jul-2017

 
काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूची किंवा एखाद्याच्या अपघाताची बातमी येऊन थडकली,की माझ्या पोटात गोळा येतो.विशेषतः प्रभातसमयी आलेल्या अशा अमंगळ बातम्यांनी जीव गुदमरतो.काल भल्या सकाळी असाच मंदारचा फोन आला,"पालकर,नीट ऐक.तेंडुलकर गेले.१ वाजता वैकुंठ स्मशानभूमी!!" मन सुन्न झाले.आमच्या मोजक्याच पण यादगार भेटींच्या हृद्य आठवणींची मनात गर्दी झाली.

माझा परममित्र मंदार चक्रदेव आणि मंगेश तेंडुलकर यांचा आत्मीय ऋणानुबंध!! त्याच्यामुळेच तेंडुलकर सरांशी स्नेहबंध जुळंला याबद्दल मी त्याचा ऋणी आहे.पण त्यांना प्रथम भेटलो ती कहाणी विलक्षण आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना ऑगस्ट २०१५ ला "महाराष्ट्रभूषण" पुरस्काराने गौरवण्यात आले होते,पण पुणे महानगरपालिकेतील तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना ती बाबासाहेबांची allergy असल्याने त्यांनी त्यांचा जाहीर नागरी सत्कार करायचे साधे औचित्यही दाखवले नाही.पण आम्ही सुज्ञ पुणेकर स्वयंभू आहोत आणि असल्या लबाड राजकारण्यांना आम्ही काडीचीही किंमत देत नाही हे अधोरेखित करण्यासाठी शनिवार कट्ट्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना सर्व पुणेकरांच्या वतीने मानपत्र द्यायचे ठरवले.मग सप्टेंबर २०१५ मध्ये त्यादृष्टीने मी आणि मंदारने हालचाली सुरु केल्या.पहिले बाबासाहेबांची औपचारिक संमती घेतली. ती त्यांनी त्यांच्या उमद्या स्वभावाला अनुसरून लगेच दिली. पण त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की हा छोटेखानी कार्यक्रम असावा आणि तो इथेच पुरंदरे वाड्यात व्हावा. त्याला मी तात्काळ होकार दिला. पण एक मोठा प्रश्न अनुत्तरीतच होता : मानपत्र कोणाच्या हस्ते द्यायचं? कारण बाबासाहेबांचा गौरव करू शकतील अशा ज्येष्ठ व्यक्ती पुण्यात नव्हत्याच. दाजीकाका गाडगीळ हयात नव्हते आणि भाऊसाहेब चितळे प्रकृतीअस्वास्थ्यामुळे घराबाहेर पडू शकत नव्हते. मग मंदारने नाव सुचवलं मंगेश तेंडुलकर!! लगेच दुसऱ्या दिवशी भेटून त्यांना हा कार्यक्रम सविस्तर सांगितला आणि येण्याची विनंती केली. पण तेंडुलकर म्हणाले की बाबासाहेबांच्या पायाशी बसायची माझी लायकी. ते मला बरेच वडील असल्याने मी त्यांना मानपत्र कसं देणार? शेवटी खूप विनंती केल्यावर ते राजी झाले पण आधी बाबासाहेबांना यावर हरकत नाही ना हे खात्री करून घेण्याची सूचना केली. त्याच दिवशी संध्याकाळी मी बाबांना भेटून हा प्रस्ताव ठेवला.त्यालाही बाबांनी आनंदाने होकार दर्शवला. "मंगेशराव माझे आवडते कलाकार आहेत. त्यांच्या हातून मानपत्र स्वीकारण्यात मला आनंदच वाटेल!!" मग ऑक्टोबर २०१५ मंगेश सरांच्या शुभहस्ते आणि डॉ.सतीश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार कार्यक्रम पार पडला.

शनिवार कट्ट्याच्या प्रथम वर्धापनदिनालाही तेंडुलकर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. खरेतर त्यांना त्यादिवशी त्याच वेळी अजून एक कौटुंबिक कार्यक्रम होता.पण दिलेला शब्द पाळणारे म्हणजे मंगेश तेंडुलकर हे समीकरणच होतं. त्यानुसार ते ६ च्या ठोक्याला आले आणि ७ वाजता सर्व मान्यवर आणि उपस्थित पाहुण्यांची माफी मागत ते थोडे लवकर निघाले. मी त्यांना सोडायला साहित्य परिषदेच्या दाराशी गेलो तेव्हा मलाही म्हणाले "सॉरी,पूर्णवेळ थांबू शकलो नाही.पण तू मला बोलावल्याबद्दल आभारी आहे.खूप बरं वाटलं.असेच दिगंत यश मिळो!!" त्यांच्या या प्रेमाच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं.काहीच न बोलता मी केवळ त्यांचे पाय धरले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि आदरणीय माधवराव आपटे यांच्यासोबत आदरणीय मंगेश तेंडुलकर सर आमच्या "शनिवार कट्टा मुक्तपीठ"चे दीपस्तंभ होते.पण काल त्यातला एक दीप मालवल्याने अचानक पसरलेल्या अंधारातून मार्ग काढायला शनिवार कट्ट्याला बराच वेळ लागणार आहे.एक अमूल्य ठेवा देवाने आमच्यापासून न सांगता हिरावून नेलाय.

कलाकार म्हणून तेंडुलकर निःसंशयपणे अफलातून होते. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंसारखे तेही राजकीय व्यंगचित्रकार होते. पण त्यांची स्वतंत्र शैली होती. बाळासाहेब आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी देश-विदेशातल्या मातब्बर नेत्यांना घायाळ करत.त्यांची व्यंगचित्रे म्हणजे तलवारीचा घणाघाती वार. पण तेंडुलकरांची व्यंगचित्रं चटका लावायची.रक्त न काढता हृदयाला टोचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते.ठासून भरलेले sarcasm हे त्यांच्या व्यंगचित्राचे खास वैशिष्ट्य. त्यामुळे,"तुला माहितीये का आपन कोने" या category च्या समजण्यापलीकडे ती होती. त्यांच्या व्यंगचित्रांनी भले भले ढुढ्ढाचार्य आणि विद्वानांच्या पगड्या उडवल्या. भ्रष्ट नेते आणि कामचुकार प्रशासनाला नागवे केले. तेंडुलकर अत्यंत सर्जनशील होते.
  
 
 
वाहतुकीचे नियम मोडल्याने होणारे भयंकर अपघात, त्यात हकनाक जाणारे बळी यामुळे तेंडुलकर कष्टी होत. पण नुसते हातावर हात ठेवून बसणारे तेंडुलकर नव्हेत.त्यांनी पुढाकार घेऊन १५ वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी नळस्टॉप चौकात वाहतूक शिस्तीच्या प्रबोधनासाठी स्वतःची व्यंगचित्र छापलेली शुभेच्छापत्रे नागरिकांना भेट द्यायला सुरुवात केली. हा शिरस्ता अखंड चालू होता. मला तेंडुलकर खरे गांधीवादी वाटायचे. कुठल्याही महत्वाच्या सामाजिक प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर बसून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात ते अग्रभागी असत. पण कुठेही आक्रस्ताळेपणा नाही,की सभ्यतेची पायरी सोडणे नाही. त्यांच्यात पेशंस प्रचंड होता. कौतुकासोबत राजकीय टोळभैरवांच्या शिव्याही ते तितक्याच गोड मानून घ्यायचे.पण कधीही त्यांचा तोल सुटला नाही,आणि भीती तर त्यांनी कधीच बाळगली नाही.किंबहुना कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण निर्भय राहावं,मग आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही असाच सल्ला ते नेहमी आम्हाला द्यायचे.

अॅवेंजर बाईक चालवणारे तेंडुलकर एकदम डूड आजोबा होते.दोन्ही कार्यक्रमांना ते बाईक चालवत आल्याचे पाहून माझ्या मित्रमंडळींनी आवाक होऊन तोंडात बोटं घातली होती. ८० वर्षाच्या म्हाताऱ्याने ऐन तारुण्यातल्या मस्तीला न बोलता गारद केलं होतं.पण आत्ता २ महिन्यांपूर्वी त्यांच्याशी फोनवरून बोललो.नुकतंच हार्नियाचं ऑपरेशन झाल्याने बाईक बंद झाली होती. आवाजही थोडा कातर वाटला. मग तेंडुलकर काकूंशी बोललो. कलाकाराची सहधर्मचारिणी असणे हे एक आव्हानच.पण त्या माऊलीने पडेल तो भार उचलला आणि सरांना भक्कम साथ दिली.आम्हा पोरा-सोरांनाही प्रेमाने खाऊ-पिऊ घातलं. मग काकूंनाही सांगितलं की काही लागलं तर कधीही फोन करा,आम्ही हजर असू. सरांना सांगा लवकरच भेटायला येऊ.पण शेवटपर्यंत ते काही जमलं नाही. 
 
आणि काल अचानक आपला ब्रश घेऊन तेंडुलकर देवाच्या वन वे रूटने त्याच्याकडे रवाना झाले, कधीही न परतण्यासाठी!! त्यांना भेटायला गेलो नाही हा आमचाच दोष, आणि ती रुखरुख कायम मनात राहील. काल वैकुंठात स्ट्रेचरवर अचेतन पण शांतपणे निद्राधीन झालेले तेंडुलकर पाहताना भावनावश झालो. मात्र अश्रू आवरले. पण रात्री वैशालीतून घरी पोचल्यावर देवघरात आईने वाहिलेल्या सोनचाफ्याच्या सुगंधाने आणि निरव शांततेने त्या खोलीला व्यापून टाकले. भावनांच्या कल्लोळाने अंतःकरण भरून आले. प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले आणि निरपेक्ष प्रेम करणारे तेंडुलकर मला परत दिसणार नव्हते. मी आणि मंदार परत एकदा आजोबांच्या प्रेमाला पारखे झालो. कितीतरी वेळ मी ओट्याशी उभा राहून रडत होतो. त्या सुगंधासारखेच तेंडुलकर सर्वत्र भरून राहिले होते. देह अनंतात विलीन झाला होता!! 
 
- वरुण राजीव पालकर