भारताने आपले सैन्य मागे घ्यावे - चीनचा पुन्हा रेटा
 महा त भा  11-Jul-2017


बिजिंग : भारत आणि चीन यांच्यात सिक्कीम येथील सीमेवरून सुरु असलेल्या वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच दरम्यान दोन्ही देशातील संबंध टिकवण्यासाठी तसेच सीमावादावरील चर्चेसाठी भारताने विनाअट आपले सैन्य मागे घ्यावे' अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा केली आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुयांग यांनी काल रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे. तसेच जर भारतीय सैन्याने दीर्घकाळासाठी तयारी सुरू केली आहे तर मग राजनैतिक प्रश्नांसाठी जागा कशी असू शकत नाही असे देखील शुयांग यांनी म्हटले आहे.

भारतीय सैनिकांनी अनधिकृतपणे चीनच्या सीमेत प्रवेश करून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच भारतीय सैन्य जर चीनला टक्कर देण्याच्या तयारीनिशी डोकलाममध्ये तळ ठोकून बसले असेल तर यामुळे दोन्ही देशांमध्ये कसलीही चर्चा होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे चर्चेसाठी भारताने विनाअट आपले सैन्य तातडीने मागे घ्यावे, असे शुयांग यांनी म्हटले आहे.


तसेच भारताने सैन्य मागे घेतल्यास चीन डोकलाम भागात सुरु असलेला रस्ते विकास थांबवणार का ? या प्रश्नावर शुयांग म्हणाले कि,''भारतीय सैन्य ज्या भागात आले आहे, तो संपूर्ण प्रदेश चीनच्या मालकीचा आहे. त्यामुळे त्याठिकाणी विकासकामे करण्याच्या चीनला पूर्ण अधिकार आहे. भारताने जरी आपले सैन्य मागे घेतले तरी चीन आपली विकासकामे थांबवणार नाही'', असे शुयांग यांनी स्पष्ट केले आहे.