चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा श्रीलंकेकडून पराभव
 महा त भा  09-Jun-2017लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा श्रीलंकेने ७ गडी राखून पराभव केला आहे. भारताच्या फलंदाजांनी उत्तम खेळी करत ३२२ धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले होते. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात श्रीलंकेचे एकूण तीन फलंदाज बाद झाले. भारताच्या गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने श्रीलंकेने ३२२ धावांचे आव्हान ७ गडी राखून पूर्ण केले. श्रीलंकेचा सलामीवीर निरोशान डिक्वेलला माघारी धाडल्यानंतर हा सामना भारत जिंकेल असे वाटत असतानाच कुशल मेंडिस ८९ आणि दनुष्का गुनाथिलाका ७६ यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १५९ धावांची भागिदारी केली. त्यामुळे विजय भारताच्या हातून निसटत गेला.

Embeded Object


भारताकडून शिखर धवनने १२५ धावांची खेळी करत धावसंख्या उभारली. तर त्याच्या साथीने रोहीत शर्मा यानेही ७८ धावा तर महेंद्रसिंग धोनीने ६३ धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंगला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजांची कामगिरी मात्र सुमार ठरली. भुवनेश्वर कुमारने एकाला बाद केल्यानंतर उर्वरित दोन फलंदाज धावचित झाले. भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त भारताच्या एकाही गोलंदाजाला श्रीलंकेच्या फलंदाजाला बाद करता आले नाही.


गुणतालिकेत भारतच अव्वल


भारत - श्रीलंका ग्रुप बी सामन्यात जरी भारत श्रीलंकेकडून पराभूत झाला असला तरी गुणतालिकेत भारतच अव्वल ठरला आहे. भारताचे आत्तापर्यंत २ सामने झाले असून त्यापैकी एका सामन्यात विजयी तर एका सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत +१.२७२ गुण मिळवत भारत अव्वल आहे. तर श्रीलंकेने आत्तापर्यंत २ सामने खेळले असून त्यापैकी एका सामन्यात विजयी तर एका सामन्यात ते पराभूत झाले आहेत. असे असले तरी गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या स्थानी असून त्यांना -०.८७९ गुण मिळवता आले आहेत.