शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : 'खामखा'
 महा त भा  07-Jun-2017अनेकदा आपण माणसाच्या पेहरावावरुन, त्याच्या हातातील पुस्तकावरुन आणि एकूणच त्याच्या व्यक्तिमत्वावरुन त्या माणसाला न ओळखताही जजमेंटल होतो. आणि अनेकदा आपले हे जजमेंट्स चुकू शकतात. तेच सांगणारी ही कथा म्हणजेत.. "खामखा"..

एक मुलगा.. चांगल्या मोठ्या कंपनीत काम करणारा, महत्वाच्या मीटींग साठी मुंबईला निघालेला.. अगदी "हाय-फाय" अशा श्रेणीत मोडणारा. मात्र त्याची गाडी भर रस्त्यात खराब होते. आणि त्याला जावं लागतं, अगदीच साध्या स्थानिक बसने. सतत एसी मध्ये फिरणाऱ्या आणि टिप-टॉप लोकांसबोत जगणाऱ्या या तरुणाला हा असा प्रवास जरासा झेपत नाही..

याच प्रवासात त्याला एक मुलगी भेटते. कुरता घातलेली, हिंदीत बोलणारी, हिंदी पुस्तकं वाचणारी, साधी सरळ मुलगी. तिच्या बद्दल त्याचं एक मत तयार होतं. मात्र जेव्हा तो तिच्याशी बोलतो, तिच्या सोबत रस्त्यात चहा घेतो, तेव्हा त्याला तिच्यातील एका वेगळ्याच मुलीचे दर्शन होतं. काय होतं असं? तिच्यातल्या साध्या मुलीत अचानक त्याला काय वेगळं दिसतं? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट...

Embeded Objectआपल्या देशात इंग्रजी भाषेला मिळालेलं गरजेपेक्षा जास्त महत्व, हिंदी आणि इतर भाषांकडे होणारं दुर्लक्ष याविषयी या लघुपटात भाष्य करण्यात आलेलं आहे. 'जाने तू या जाने ना' फेम मंजिरी फडणीस आणि हर्षवर्धन राणे या लघुपटात मुख्य भूमिकेत आहेत. या लघुपटात एक सुंदर वाक्य आहे.. " जेव्हा आपल्या इथे कुणी चुकीची इंग्रजी बोलतं, तेव्हा ते लगेच खटकतं, मात्र जेव्हा चुकीची हिंदी बोलल्या जाते.. किंवा "आय डोन्ट स्पीक हिंदी मॅन" असे म्हटले जाते तेव्हा ते नक्कीच कूल वाटतं...."

या लघुपटाला 'फिल्मफेअर पीपल्स चॉइस अवॉर्ड' हा पुरस्कार मिळाला आहे. या लघुपटाला यूट्यूबवर १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आरती बागदी यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट एकदा तरी आवर्जून पाहण्यासारखा आहे.

 

- निहारिका पोळ