आयुर्वेदिक रेसिपी- तुम्बी फलशाकम्
 महा त भा  06-Jun-2017

फलशाक (आरोग्यदायी फळभाज्या)

 

प्राचीन काळापासून शाक हा आहारातील प्रमुख घटक आहे. ह्या शाकवर्गात पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या, कंदमुळे इ. चा समावेश होतो. शरीरास अपाय न करणाऱ्या व रुचकर असणाऱ्या वनस्पतींच्या पाने, फुले, देठ. कंदमूळ ह्या अंगांचा विशेषत्वाने वापर करून शाक सिद्ध केली जाते. वनस्पतींची पाने, फुले, फळे, देठ, कंदमूळ, उत्तरोत्तर गुरु आहेत. ह्या शाकवर्गाच्या पाककृतींचे फलशाक व पत्रशाक असे २ भाग केले आहेत.

फळभाज्या ह्या पालेभाज्यांपेक्षा पथ्य असें आयुर्वेद सांगतो. साहजिकच आहारात त्यांचा समावेश जास्त प्रमाणात असावा. आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये फलशाकाच्या अनेक पाककृती लिहून ठेवल्या आहेत. भारतीय आहार संकल्पनेअंतर्गत ह्यातील अनेक पाककृतींचा समावेश पूर्वीपासून केलेला आढळतो. भाजीच्या गुण - धर्मांनुसार आपली प्रकृती व दोष प्राधान्य लक्षात घेऊन त्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्यास शरीरात दोषांची स्थिती संतुलित राहील व आजाराचे प्रमाण निश्चितच कमी होईल.

ह्या सदराची सुरुवात "तुम्बी फलशाक" (भोपळ्याची भाजी) ह्याच्या पाककृतीने करूया.

 

 

तुम्बी फलशाकम् (भोपळ्याची भाजी)

संदर्भ: क्षेमकुतूहल

 

भोपळा ही सहसा कोणाला न आवडणारी भाजी आहे. पण अतिशय पथ्य असणारे हे शाक सर्वांनी नियमितपणे खावे.

 

 

साहित्य:-

 

५०० ग्रॅम कोवळा भोपळा

१/२ वाटी ताजं दही

१ चमचा जिरे

३-४ चमचे गाईचे तूप

चिमूटभर हिंग

२ चमचे सैंधव (शेंदेलोण)

 

वाढणी:- २

 

कृती:-

१. सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धुऊन घ्यावा व त्याची साले काढून घ्यावीत.

२. भोपळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे.

 

३. एका कढईत मंद आचेवर तूप गरम झाले कि हिंग व जिरे घालून फोडणी करावी. त्यामध्ये भोपळ्याचे तुकडे, चवीपुरते मीठ घालावे व मध्यम आचेवर भोपळा शिजू द्यावा. भोपळा पट्कन शिजतो, कढई झाकायची गरज नाही.

४. साधारण १५ मिनिटात भोपळा शिजला कि कढई गॅसवरून उतरवून ठेवावी व भोपळ्याची भाजी थंड झाल्यावर त्यामध्ये दही घालून चांगले ढवळून घ्यावे.

५. भाजीमध्ये आपण वरून कोथिंबीर सुद्धा घालू शकतो. चविष्ट अशी ही भोपळ्याची भाजी गरम-गरम फुलक्यांसोबत सर्व्ह करावी, छान लागते.

 

 

फलश्रुती (फायदे) :-

 

१. गोड़ भोपळा हा गुरु (पचायला जड) असतो म्हणून सहसा भोपळ्याची भाजी दुपारच्या जेवणातच खावी.

२. हृद्य: भोपळा हृदयासाठी हितकर असतो म्ह्णून हृदयाचे विकार असणाऱ्यांनी ह्याचे सेवन दर आठवड्यातून एकदा तरी करावे.

३. वीर्यकर: भोपळा त्याच्या गुण-धर्मांमुळे पुरुषांमध्ये वीर्य वाढविण्यास मदत करतो ज्यामुळे साहजिकच पुरुषाची संभोग क्षमता नैसर्गिकरित्या वाढते.

४. पित्तघ्न: थंड असल्यामुळे भोपळा पित्त दोषाचे शमन करतो म्हणून पित्त प्रकृती असणाऱ्यांसाठी अतिशय पथ्य आहे.

 

असा हा चविष्ट आणि आरोग्यदायी भोपळा हा निश्चितच आहारात नियमितपणे खावा.

 - विशाखा मोघे