जिल्‍हयात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
 महा त भा  03-Jun-2017


 

अहमदनगर जिल्‍हयात विविध मागण्‍यांसाठी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने उपोषण, मोर्चा, रास्‍तारोको इत्‍यादी प्रकारचे आंदोलनात्‍मक कार्यक्रम चालू आहेत. तसेच  दिनांक २८ मे पासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना चालू आहे. या पार्श्‍वभुमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्‍हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत दिनांक ३ जून ते दिनांक १६ जून पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहे.

आदेशात नमूद केलेल्‍या कालावधीत व ठिकाणी, धार्मिक कार्यक्रम वगळता कोणालाही खालील कृत्‍ये करण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे. 

अ) शस्‍त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करण्‍यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्‍तू बरोबर नेणे.

ब)  दगड किंवा इतर क्षेपणास्‍त्रे  किंवा सोडावयाची  किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे.

क)  कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या आकृत्‍या किंवा त्‍यांच्‍या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

ड)  कोणताही दाहक पदार्थ किंवा स्‍फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे.

इ)  जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्‍हणणे , वादय वाजविणे.

ई)  सभ्‍यता अगर नि‍तीमत्‍ता  यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे,  आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्‍ह किंवा इतर वस्‍तू तयार करणे किंवा त्‍याचा प्रचार करणे.

फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचाराचे तसेच अन्‍य कारणास्‍तव सभा घेणेस , मिरवणुका काढण्‍यास व पाच पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे.