'सांस्कृतिक भवनाचे बांधकाम १४ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा' - जिल्हाधिकारी
 महा त भा  28-Jun-2017


आज सकाळी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम आणि जिल्हा क्रीडा संकुल समिती यांची पाहणी केली. त्यावेळी अनेक नवी कामे सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सध्या क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन, टेनिस हॉल तसेच जलतरण तलाव, हॉस्टेल तयार करण्याबाबत वेगाने काम केले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. यावेळी सर्व प्रलंबित कामे १४ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देखील पाण्डेय यांनी संबंधी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


सांस्कृतिक भवनासाठी महानगर पालिकेकडून मिळणाऱ्या निधीचा वाटा उपलब्ध होण्यासाठी तत्काळ पत्रव्यवहार करून त्याची अंमलबजावणी वेळेत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाची पाहणी करताना इलेक्ट्रीक व अंतर्गत रचना तसेच परिसरात संरक्षण भिंत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे इतर सर्व कामे जलदगतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करावी असेही ते म्हणाले.


त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील स्व. वसंत देसाई स्टेडियमची पाहणी केली. स्टेडियम परिसरात उभारण्यात येत असलेल्या बॉक्सिंग हॉल आणि जिम्नॅस्टिक हॉलची त्यांनी पाहणी केली. जुन्या बॉक्सिंग हॉलमधील साहित्याची दुरुस्ती आणि वॉटर प्रुफिंग करण्याची त्यांनी सूचना केली. जलतरण तलावाची पाहणी केल्यानंतर स्वच्छता ठेवण्यास त्यांनी सांगितले. स्टेडियमच्या परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी लाईटची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.


यावेळी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे उपस्थित होते. एकूणच या दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या कामाचा वेग मंदावला असून अनेक प्रलंबित कामांमधील बारकावे तपासले जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.