शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : "लगोरी"
 महा त भा  27-Jun-2017लगोरी म्हटलं की, आठवतं ते बालपण. ती सोसायटी मधली किंवा वाड्यामधली मोठ्ठी गँग, त्यांच्या सोबत उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत तासंतास लगोरी खेळणं, ते धावणं, ती लगबग, तो सा... ट्टकन लागलेला मार.. त्याची मज्जाच काही औरच. पण ही लगोरी ती नाही. ही लगोरी आहे, एका अशा मुलाच्या संघर्षाची कहाणी ज्याचं लहानपणापासून केवळ हसंच झालं आहे. आज बघूयात ही आगळी वेगळी लगोरी..

एक मुलगा. चष्मा घातलेला, स्थूल प्रकृतीचा, बुझरा. आकर्षक असं काहीच नाही त्याच्यात. बाहेरून मुंबईत आलेला. कॉलनीतील मित्रांसोबत लगोरी खेळतोय, मात्र त्याला काहीच जमत नाहीये, लगोरी फोडता ही येत नाहीये, धावताही येत नाहीये आणि काहीच नाही. कमजोर व्यक्तिमत्वाचा असल्याने सगळे त्याची टर उडवतात. त्याला हसतात, आणि इथूनच सुरुवात होते त्याच्या आयुष्याच्या रॅगिंगची. आणि अचानक पुढचा सीन येतो, ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला एक मुलगा, लोकल मधून खाली पडला असं कोणातरी सांगतं. डॉक्टर्स त्याला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत.. मात्र तो वाचेल? त्या लगोरी खेळणाऱ्या मुलाचा, आणि या ऑपरेशन थिएटरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाचा काही संबंध आहे का? असेल तर काय? आणि हे रॅगिंग कुठून आलं.. या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की बघा "लगोरी" हा लघुपट..
 

 
सिक्स सिग्मा फिल्मच्या या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे प्रथमेश मदन पाटील याने.. आयुष्यात आपलं कितीही हसं झालं, कुणी कितीही चिडवायचा प्रयत्न केला, अगदी देवाने ही आणि आयुष्यानेही तरीही जिंकण्याचा एक चान्स आपल्याकडे नेहमी असतो हा मोलाचा संदेश या लघुपटात देण्यात आला आहे. वरची कथा थोडी अर्धवट वाटली असणार, अनेक प्रश्न देखील पडले असणार. त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी नक्की बघा "लगोरी."..
 
- निहारिका पोळ