आयुर्वेदिक रेसिपीज - भरित्रिकम्
 महा त भा  27-Jun-2017

 

आरोग्यदायी फळभाज्या

 

 भरित्रिकम् (वांग्याचे भरीत)

संदर्भ :- निघंटु रत्नाकर

 

भारतीय पाकशास्त्राची प्रगल्भता पाहता एका भाजीचे अनेक प्रकार स्थानिक पद्धतींनुसार केले जातात.

वांगं ही एक अशी भाजी आहे जी संपूर्ण भारतात विविध पद्धतींनी केली जाते. दक्षिणेतला आमटीचा आवडता प्रकार म्हणजे सांबार. सांबारातील महत्वाचा घटक म्हणजे वांग. तसेच उत्तर भारतात "तंदूर" पद्धतीने कोळशावर वांग्याला भाजून त्याची भाजी किंवा भरीत म्हणजे "बैंगन का भरता" असे चविष्ट प्रकार केले जातात. असे केल्याने वांग्यामध्ये "smoky flavor" येऊन त्याची चवच बदलून जाते. आजकाल आपल्या modern किचनमध्ये कोळशाची तंदूर ठेवणं शक्य नसल्यामुळे आपण वांगं हे गॅस स्टोव्ह वरच भाजून त्याचा वापर भाजी किंवा भरीत बनवण्यासाठी करू शकतो.

 

 

वांग्याचे काळे व पांढरे असे २ प्रकार असतात. काळे वांगे हे पचायला हल्के, किंचित कडू, तिखट व उष्ण असते. ते वात शमन करते मात्र पित्त वाढवते. पांढरे वांगे सुद्धा उष्णच असते व त्याचा अर्श (Piles) मध्ये चांगला उपयोग होतो. 

महाराष्ट्रात देखील वांग्याच्या भाजीपेक्षा वांग्याचे भरीत जास्त आवडीने खाल्ले जाते. पण ते जितक्या साध्या पद्धतीने केले जाईल तितकेच ते पथ्यकर असते. कांदा व टोमॅटो घालून केलेल्या भरतापेक्षा अगदी मोजके मसाले वापरून केलेले भरीत हे भाजलेल्या वांग्याचे गुण वाढवून त्याची विशिष्ट असलेली चव सुद्धा वाढवते.

आयुर्वेदातील "वांग्याचे भरीत" म्हणजे भरित्रिकम् व त्याची कृती खालीलप्रमाणे :-

 

साहित्य:-

२५० ग्राम काळी वांगी

२ हिरव्या मिरच्या

१/४ वाटी किसलेले खोबरे

१/४ वाटी दही

हिरवी कोथिंबीर

चवीपुरते सैंधव (शेंदेलोण)

चिमूटभर हिंग

४ चमचे गाईचे तूप

 

वाढणी (Serves):- २

 

कृती:-

१. सर्वप्रथम वांगी गॅसवर भाजायला ठेवावी. एक बाजू भाजून झाली कि दुसरी बाजू भाजायला ठेवावी. अशा प्रकारे पूर्ण वांगे नीट भाजून घ्यावे. वांग्याची साले काळी होऊन साले जळल्याचा वास आला पाहिजे.


२. वांगे काही वेळ गार होण्यास ठेवावे व त्याचे साल सोलून काढावे.


३. वांगे कुस्करून त्यात सैंधव, कोथिंबीर, चिरलेली मिरची, नारळाचा कीस व दही घालून हाताने कालवावे.

४. छोट्या कढईत फोडणी करण्यासाठी तूप घ्यावे. तूप गरम झाले की, हिंग घालून फोडणी करावी. वांग्याच्या मिश्रणाला तुपाची फोडणी देऊन सर्व नीट एकत्र करून घ्यावे. वरून हवी असल्यास कोथिंबीर घालावी.


 

५. तयार वांग्याचे भरीत गरम - गरम फुल्के किंवा भाकरी सोबत खावे.

 

फलश्रुती (फायदे) :-

१. दीपन - पाचन - जठराग्नीला प्रज्वलित करून पाचन करते.

२. शिरःशूल - डोके-दुखी मध्ये आहार स्वरूपात औषधच आहे. डोके दुखत असल्यास पथ्य म्हणून द्यावे.

३. जीर्ण-ज्वर - बऱ्याच दिवसांचा ताप असल्यास वांग्याचे भरीत द्यावे.

४. गुल्म - पोटात वायूचा गोळा झाल्यास वांग्याचे भरीत खाल्ल्याने वात खाली सरतो.

५. कामला - काविळीत वांग्याचे भरीत खाल्ल्याने उपशय मिळतो.

 

हे वांग्याचे भरीत नक्की करून पहा व आपली प्रतिक्रिया कळवा.

- वैद्य विशाखा मोघे