विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २३
 महा त भा  23-Jun-2017


अवंती : मेधाकाकू, आपला विषय आणि अभ्यास आता खूप रंगतदार झालाय आणि आज मला कालच्या मनोविश्लेषकाच्या गोष्टीची उत्सुकता लागून राहिली आहे...!!

 

मेधाकाकू : आता कालच्या पुढे ऐक, नामवंत मनोविश्लेषज्ञ डॉ. सिग्मंड फ्रॉईड. त्याचा शिष्य डॉ. कार्ल गुस्ताव यंग आणि डॉ. जॅक लाकाँ या सर्वांनी मानवी व्यक्तिमत्त्वाच्या संकल्पनेच्या गाभ्याशी जीवात्मा आहे असा सिद्धान्त विसाव्या शतकात मांडला. जीवात्मा म्हणजे स्वच्या अस्तित्वाचे भान. या स्व विषयक भानामुळे व्यक्तीला स्थैर्य आणि एकजिनसीपणा येतो. या तिघांच्या मते प्रत्येक मानवाच्या सामूहिक अबोध मनातील (collective unconscious) संचित हे पुरातन काळापासून वंशपरंपरागत, जन्मदात्री आणि जन्मदात्यांपासून निसर्गत: प्राप्त झालेला वारसा असतो. त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेले सामाजिक अनुभव हे प्रत्येक व्यक्तीला सहज प्रेरणेने येतात. आता तुला लक्षात येईल की, आपल्या अभ्यासातील वाकप्रचार आणि त्याचा अर्थ, प्रत्येकासाठी किती संवेदनशील अशी सहज प्रेरणा असावी...!    

 

अवंती : मेधाकाकू, सही है यार…!! एकदम फंडामेंटल...!! 

 

मेधाकाकू : आता एक लक्षात घे की, कोणा पाश्चात्य विद्वानांनी संगितले म्हणून तुला हे पटले पाहिजे असे अजिबात नाही. आता, दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासातील पहिल्या श्लोकात समर्थ रामदास काय म्हणतात पाहूया. फ्रॉईड आणि इतर सिद्धांतकार विसाव्या शतकाच्या सुरूवातीला आले, तर साधारण ३५० वर्षांपूर्वी समर्थांनी हेच मार्गदर्शन श्रोत्यांना केले आहे ते असे...!! 

ऐक ज्ञानाचे लक्षण l ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान l

पाहावें आपणासि आपण l या नांव ज्ञान l                                             

आत्मज्ञान- आत्मप्रेरणा- आत्मसाक्षात्कार हा व्यक्तिमत्त्व विकासातील फार महत्वाचे टप्पे आहेत. समर्थांसह प्रत्येक मराठी संताने असा परिपक्वतेचा टप्पा गाठलेला होताच आणि श्रोत्यांना तसे मार्गदर्शन आपल्या निरुपणातून केले होते. आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या अभ्यासातील या म्हणी आणि वाकप्रचारांचे, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील महत्व समजाऊन घेऊया...!! 

 

अवंती : मेधाकाकू, आता माझ्या समजुतीत हळूहळू फरक होतोय आणि तो असा आहे की, सहज कानावर पडणार्‍या नव्या गोष्टींचा- नव्या शब्दांचा अर्थ, बर्‍याचवेळा अगदी सहज - सहज प्रेरणेने मला जाणवलेला असतो...!!

      

मेधाकाकू : अगदी छान समजून घेतलयस बघ हे सगळे...!! आता आपल्या समोरचा हा वाकप्रचार किती सहज असवा असे वाटते, मात्र त्यामागे अनेक शतकांचा सामूहिक अनुभव नक्कीच ठासून भरलेला असावा...!!

आम्ही खावे आम्ही प्यावे जमा खर्च तुमच्या नावे.  

याचा भावार्थ लक्षात घेता, अशा प्रवृत्ती आणि दुसर्‍याच्या अथवा समाजाच्या जिवावर असे वागणारे अनेक महाभाग आजही आपल्या समाजात आहेतच...!! जोपर्यंत याचा जाब विचारणारी यंत्रणा निष्क्रिय असते तोपर्यंत अशा प्रवृत्तीची वाढ वेगाने होत असते...!! आता आपल्या अभ्यासाला एक नवा संदर्भ आहे आपल्या मराठी भाषा अलंकारांचा, तो काय आहे ते पाहूया...!!! अलंकारिक लेखनात एक प्रकारची चमत्कृती दिसते, शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्द चमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थ चमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो. आपला हा वाकप्रचार, स्वभावोक्ती या अर्थालंकाराचे उत्तम उदाहरण आहे...!! यात व्यक्तीच्या स्वभाव आणि आचरण वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे...!!

 

अवंती : मेधाकाकू, आपण अजूनही अन्नविषयक म्हणींचीच चर्चा करतो आहोत आणि परवा डाळिंब्या सोलताना आजीने एक मस्त आठवण सांगितली...!! तिच्या लहानपणी ऐकलेला वाकप्रचार...!! याबद्दल सांगना काही...!!  

खूब खाय वाल तर होतील मोठे गाल.

 मेधाकाकू : अरे व्वा... आजीने मस्तच सांगितले काही. एकदम झक्कासे की हे. ओके, आता असे बघ की यातला वालहा शब्द रूढार्थाने वाल, एक कडधान्य, या अर्थी न घेता अन्न–धान्य-खायचा पदार्थ अशा व्यापक अर्थाने इथे वापरला आहे. असा सल्ला देताना बघ, वाल आणि गाल किती छान ‘यमक जुळवलय. अनुभवाने दिलेला हा सल्ला असे सांगतो की, किती आहार घेता याचा विचार करा कारण, नियमित आहारात पदार्थ आवडलाय म्हणून चार-सहा घास जास्त जेवलात, तर ते सुद्धा मेदवृद्धीला कारण होतील तेंव्हा, आहारात संयम हवाच...!!

        

अवंती : मेधाकाकू अगं आजी काल मस्त मूडमध्ये होती आणि तिने तिच्या लहानपणीच्या खूप गमतीच्या गोष्टी सांगितल्या. तिची मोठी काकू नेहमी तिच्या धाकट्या मुलाबद्दल तक्रार करायची. तुला काय वाटतय ही गम्मत ऐकून, ते सांग....!!!

आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या.   

 

मेधाकाकू : अरेच्या, किती वेगळं काहीतरी ऐकलं आज. आपल्या मुलाच्या सवयीं विषयी एका आईची चिंता. अवंती, मला असे वाटतय की, त्या आईची तक्रार ही फक्त आहाराच्या सवयीचा संदर्भ देऊन थांबत नाहीये. समाजातील अनेक वडीलधार्‍यांची ही खंत आहे. यातला मथितार्थ असा घ्यायचा की कुटुंबातील प्रत्येक मुलाने, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवायला हवी. आपल्या गरजा-आवडी यावर नियंत्रण ठेवायला हवे, ते कसे ठेवायचे ते वडीलधार्‍यांकडून समजून घ्यायलाच हवे. आता माझी किचन ड्यूटी सुरू करायची आहे म्हणून जाताजाता आजच्या वाढलेल्या अभ्यासाचा अलंकार संदर्भ. पहिल्या विधानाच्या समर्थनार्थ लगेचच विशेष उदाहरण देणारा हा वाकप्रचार म्हणजे अर्थान्तरन्यास अलंकाराचे उत्तम उदाहरण...!!

 

अवंती : मेधाकाकू, आजचा वाकप्रचारांचा आहार एकदम भरपेट झालाय. मी वाट पाहाते आता उद्याची...!!

 

- अरुण फडके