सायकल राष्ट्रीय वाहन व्हावे म्हणून अकोलकरांची सायकल वारी !
 महा त भा  21-Jun-2017


सायकलला राष्ट्रीय वाहनाचा दर्जा देण्यात यावा यासाठी अकोल्यातील दहा तरुणांनी अकोला ते दिल्ली अशी सायकल यात्रा आजपासून सुरू केली आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठाच्या परिसरातून आज या प्रवासाची सुरुवात करण्यात आली.


या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अकोला जिल्हा निसर्ग संवर्धन परिषद व सायकल मित्र परिवार यांच्या वतीने सांगण्यात आले की, या सायकल वारीची प्रमुख मागणी म्हणजे सायकल या वाहनाला राष्ट्रीय दर्जा मिळावा हा आहे, कारण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व जपणूक यामध्ये सायकल वाहनामुळे मोठे योगदान मिळू शकते. यासाठी हे दहा सायकलस्वार राष्ट्रपती व पंतप्रधान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या संबंधी निवेदन देणार आहेत. ही यात्रा २१ जून ते १५ ऑगस्टपर्यंत सायकलद्वारेच करण्याचा संकल्प दहा तरुण व काही ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.


याच बरोबर अकोला ते दिल्ली सायकल यात्रा व राज्यजोडणी करणाऱ्या महामार्गांचा अभ्यास करणे तसेच महामार्गाच्या प्रवासासाठी सायकल उपयुक्त आहे का याच देखील अभ्यास या प्रवासात करण्यात येणार आहे, अशी माहिती अकोला जिल्हा निसर्ग संवर्धन परिषदेकडून देण्यात आली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवि प्रकाश दाणी हे देखील उपस्थित होते. दाणी यांनी हिरवा झेंडा दाखवून या सायकल यात्रेला सुरुवात करून दिली.