शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : "फादर्स डे स्पेशल"
 महा त भा  20-Jun-2017

 

 

नुकताच "फादर्स डे" होवून गेला. आपल्या संस्कृतीत वडीलांसाठी वेगळा केवळ एक दिवस राखून ठेवलेला नसतो ३६५ ही दिवस त्यांचेच असतात. तरी अनेकदा ते आपल्यासाठी किती स्पेशल आहेत हे आपण त्यांना सांगू शकत नाही. अशाच काहीशा भावना या लघुपटांमधून दाखवण्यात आल्या आहेत. फादर्स डेच्या निमित्ताने आज एक पेक्षा जास्त शॉर्टफिल्म्सची मेजवानी..

१. आमद :

कधी कधी आपल्याला असे वाटते की आपले आई वडील त्यांची स्वप्ने आपल्यावर लादत आहेत. बरेचदा असे होते ही. मात्र काही झालं तरी त्यांना दुखवून, त्यांचा अपमान करुन आपण स्वत:लाच त्रास करुन घेतो. असेच काहीसे या लघुपटात दाखविण्यात आले आहे. एक कथक नृत्य शिक्षक वडील आपल्या मुलावर देखील वर्षानुवर्ष सुरु असलेल्या घरगुती परंपरेप्रमाणे कथक शिकण्याची सक्ती करतात. त्याची इच्छा नसूनही. त्याची इच्छा नाही कारण त्याच्यामते कथक हे मुलींचे नृत्य. अखेर एक दिवस तो मुलगा आपल्या वडीलांच्या गुरुंपुढे त्यांचा अपमान करतो आणि हे वडील नेहमीसाठी खचतात. कथकमध्ये 'आमद' या शब्दाचा अर्थ 'सुरुवात' असा असतो. हेच वडील मृत्युशैय्येवर असताना, त्यांचा मुलगा नात्याची एक नवीन सुरुवात करण्यासाठी आणि आपल्या कृत्यामुळे आणि इतक्या वर्षांपर्यंत सहन केलेल्या पश्चातापामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास करतो. आणि मगच त्यांना मुक्ती मिळते. तो असे काय करतो, ज्याने त्यांच्या नात्याचे वेगळे 'आमद' होते? बघूयात या लघुपटात...

 

 

२. फादर्स डे स्पेशल :

हा लघुपट एका मुलीच्या आयुष्यात तिच्या वडीलांची काय जागा असते? हे सांगणारा लघुपट आहे. ही कथा कुणा एका मुलीची नाही. अशा अनेक मुली आहेत या जगात.. एक मुलगी प्रेमात पडते. तिच्या वडीलांना त्या मुलाचे सत्य, तो कसा आहे आपल्या मुलीला सुखी ठेवू शकेल का नाही हे सगळं माहीत असतं, म्हणून ते नकार देतात.. आणि... आणि मुलगी चिडते, त्रास करुन घेते... आणि वडीलांना नाही ते बोलून घरातून निघून जाते... लग्न करते आणि आयुष्याच्या सत्याला सामोरी जाते.. तेव्हा तिला सगळ्यात जास्त आठवण येते तिच्या 'बाबांची'. ती त्यांना फोन करते आणि.... पुढे काय होतं? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट...

 

 

३. द गिफ्ट ऑफ लव्ह :

कधी कधी आपण आपल्या आयुष्यात इतके मशगूल होऊन जातो की 'त्यांना' ही प्रेमाची गरज आहे हे विसरूनच जातो. आणि ज्या वडीलांचा घटस्फोट झालेला असतो, किंवा जे एकटे असतात, त्यांना तर ही गरज जास्तच असते. अशा वेळी ते सांगत नाहीत मात्र त्यांना आपल्या आधाराची आणि 'प्रेमाच्या भेटीची' खूप खूप गरज असते. या लघुपटात एक कन्या आपल्या वडीलांसाठी हीच 'प्रेमाची भेट' (गिफ्ट ऑफ लव्ह) शोधत असते. काय असते ही भेट? फादर्स डे निमित्त या भेटीचं गुपीत जाणून घेण्यासाठी बघा हा लघुपट..

 

४. सिंगल मदर :

अशा अनेक आया असतात ज्या एकट्याने आपल्या चिमुकल्यांना वाढवतात. त्याच्या मागे अनेक कारणे असू शकतात. घटस्फोट, अॅक्सीडेंट्स मध्ये नवऱ्याचा मृत्यु, नवऱ्याने सोडून निघून जाणे किंवा काहीही. मात्र अशा आयांना पण 'फादर्स डे' ला एक सेल्युट तर केलाच पाहीजे. ही कहाणी पण अशाच एका आईची आहे जी आपल्या लेकीसाठी आई ही आहे आणि बाबाही.. मात्र समाज तिला आणि तिच्या मुलीला असंख्य प्रश्न विचारतो, टोमणे मारतो. तिच्या मुलीच्याही मनात अनेक प्रश्न येतच असतील की. त्या सर्व प्रश्नांना ती काय उत्तरं देते?

याचंच उत्तर आहे या लघुपटात...

 

 

'वडील' ही आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाची व्यक्ती असते. त्याच वक्तीसाठी स्पेशल 'शॉर्ट अॅण्ड क्रिस्प'..

 

- निहारिका पोळ