अपचनाचा सहर्ष खेद आहे
 महा त भा  19-Jun-2017

 
परंपरा, रूढी, संस्कार, संस्कृती यांचा अनोखा मिलाफ आणि सातत्यता राखू पाहणारे पंढरीचे वारकरी म्हणजे भक्तीचे वारकरी. हे भक्तीचे वारकरी तर विचारांचे वारकरी कोण बरे? असा विषय निघाला की पुरस्कारवापसी करणारे हावरट उतावीळपणे स्वतःला पुढे करतीलच. असो, तर मुद्दा असा आहे की, २०१४ साली सत्तापालट झाल्यानंतर, देशात एकदम अवैचारिक आंदोलनांचा सपाटा सुरू आहे. नव्या सरकारने कोणत्याही आयोगावर कोणाचीही नेमणूक केली की नेमणूक केलेली व्यक्ती कशी योग्य नाही, असे अयोग्यपणे सांगण्याचे आंदोलन म्हणजे सध्या डाव्या विचारवंतांचा पोटापाण्याचा धंदा आहे की काय असे वाटू लागले आहे. कालपर्यंत सगळ्याच आयोगांवर, समित्यांवर डावे विचारवंत भुजंगासन करून बसले होते. आपल्या सत्तेचा वापर करून त्यांनी ’भारत तेरे तुकडे होंगे हजार’, म्हणणारे वैचारिक विषवल्लीही जमेल त्या पद्धतीने पेरायची शिकस्त केली. तेव्हा कसे सारे आनंदी आनंद गडे, शांत शांत होते. कोणता आयोग आहे की नाही, कोणती समिती आहे? ती काय काम करते याची कानोकान खबर नसायची. कोण कोणत्या समितीचा अध्यक्ष बनतोय याचे कोणाला सोयरसुतक नसायचे. डाव्यांना त्यांची जी काही विचारधारा आहे, त्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी आयते कुरण मिळत गेले. यांच्यातल्याच काही अतिशहाण्यांनी डाव्या विचारसरणीच्या यादीत पंडित जवाहरलाल नेहरू ते अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही टाकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डाव्या विचारवंतांच्या जवळपास आणून डाव्यांनी आपली वैचारिक दिवाळखोरीच जाहीर केली आहे. तसेही खोटा इतिहास, खोटे संदर्भ देण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाहीच म्हणा. 
 
तसेच डाव्यांच्या मते सध्याचे सरकार उजव्या विचारसरणीचे आहे, मात्र उजव्या विचारसरणीचे विचारवंत कुठेच नाहीत. डावे  विचारतात कुठे आहेत उजवे विचारवंत ? तर्क आणि विचार यांच्या संहितेत डाव्यांची ही विधाने म्हणजे  मृत्यूशय्येवर बुद्धी भ्रष्ट झालेल्या व्यक्तीची तर्कहीन बडबडच आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या विचारकार्यात मग्न असलेल्या उजव्या विचारसरणीच्या विचारवंतांना आपण कुठे आहोत हे सांगण्याची तसदी घेण्याची गरजच नाही. कारण उजव्या विचारवंतांनी न सांगताही उजव्यांचे विचार याची देही याची डोळा यशस्वी होताना डाव्यांनी २०१४ साली पाहिले. हे अपयश त्यांना पचता पचत नाही.. त्यांच्या अपचनाचा सहर्ष खेद आहे.
 
 
 
 
अविचाराचा मैला कधी साफ होणार ?
निर्मल यात्राच आहे, हे मात्र खरे.. त्याला कारणही तसेच आहे. लाखो लोक मठ, फड, दिंडी या संकल्पनेतून पंढरपूरात येतात. श्रद्धाळू गावकरी, सेवाभावी संस्था, इतर दानशूर आपआपल्या परीने आपल्या गावात आलेल्या वारीचे स्वागत करतातच पण प्रश्‍न उरतो या आलेल्या लोकांसाठी शौचालये किती आणि कशी पुरी पडतील ? वारकर्‍यांच्या आणि गावकर्‍यांच्या या प्रश्‍नावरही विचार केला गेला. निर्मल वारी संकल्पनेसाठी दोन कोटी चार लाखांची तरतूद केली, पण त्याची अंमलबजावणी लोकसहभागातून, लोकजागृतीतून व्हावी असा प्रयास स्वच्छ भारताचा वसा घेतलेल्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या कारकिर्दीत सुरू झाली.  विचार करा, लाखो लोक एकाच कालावधीत आपल्या गावात आले, सगळे विधी टाळता येतात पण नैसर्गिक विधी ते तर टाळता येत नाही, म्हणजे लाखो लोक गावात प्रातःविधी आटोपणार. तो मैला जाणार कुठे ? मोठी गोष्ट.. पण आजपर्यंत मोठ्या सेक्युलॅरिझमच्या गप्पा मारणार्‍या मागच्या सरकारने म्हणावे तशी गंभीर पातळीवर याची नोंद घेतलीच नाही. यंदा मात्र लोकसहभागातून आषाढ वारी निर्मळ वारी करावी, यासाठी अवघ्या महाराष्ट्रातील सुजाण त्यातही युवा अग्रभागी आहेत. या निर्मळवारीचा भाग म्हणून देहू येथे तात्पुरती ६०० शौचालये उभारली गेली आहेत. २४ ते २७ जूनच्या दरम्यान त्यांचा वापर होणार आहे. त्यातील मैला पिंपरी चिंचवडच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार आहे. स्वच्छ निर्मळ, आरोग्यदायी वारीसाठी शौचालयांचा वापर करा, असा संदेश देऊन लाखो वारकर्‍यांना शौचालयाचा वापर करायला लावणे ही प्राथमिक गरज आहे. सेवा सहयोगसारख्या सेवाभावी संस्थांनी इतकेच नव्हे तर संघाच्या स्वयंसेवकांनीही या निर्मल वारीचे वारकरी व्हायचे व्रत अंगीकारले आहे. वारकर्‍यांच्या निर्मळ वारीसाठी ते जागृती करीत आहेत. निर्मल वारीत गाव-खेड्यातून आलेले किमान हजारो तरी लोक असतील, ज्यांनी शौचालयाचा वापर आयुष्यात केलाच नसेल. अशा लोकांनी एकदा जरी शौचालयाचा वापर केला तरी, ’जहॉं सोच वहॉं शौचालय’, हा संदेश या लोकांमार्फत त्यांच्या घरात, गावात पोहोचणार आहे. वारींने विठूराया तर भेटेलच पण आरोग्य आणि स्वच्छतेचा आयुष्यमंत्रही या निर्मल वारीत भेटेल. इथे एक प्रश्‍न आहे, वारकर्‍यांना निर्मल वारी भेटेलच हो, पण डाव्या विचारसरणीच्या अविचाराचा मैला कधी साफ होणार ?
 
- योगिता साळवी