भाजपतर्फे रामनाथ कोविंद असतील राष्ट्रपती पदाचे उमेदवार : अमित शहा
 महा त भा  19-Jun-2017राष्ट्रपती पदाच्या निवडणुका या खूप महत्वाच्या असतात. त्यातून गेल्या अनेक दिवसांपासून या बाबत चर्चा सुरु आहे. आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Embeded Objectआज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा करण्यात आली. तसेच याविषयी संपूर्ण विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविंद हे भारतीय जनता पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षाची अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यांनी समाजातील मागास वर्गीयांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी खूप संघर्ष केला आहे. देशाला रामनाथ कोविंद यांच्या सारखे राष्ट्रपती मिळाल्यास देशासाठी ही खूप महत्वाची बाब ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सोबत देखील या विषयी चर्चा करण्यात आली आहे. २३ जून रोजी उमेदवारांतर्फे अर्ज भरण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या बाबत इतर विरोधी पक्षांशी देखील चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी माध्यमांनी त्यांना " राष्ट्रपती पदासाठी भाजपचे वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बद्दल विचार करण्यात आला होता का?" असे विचारले असता, त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.