ज्ञानोबा- तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात विसावल्या
 महा त भा  19-Jun-2017


 


टाळ मृदुंगाचा गजर, माऊलींच्या नावाचा जयघोष, वैष्णवांचा मेळा, अशा भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या काल पुण्यात दाखल झाल्या आणि आज या पालख्यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे.तुकाराम महाराजांची पालखी श्री निवडूंग्या विठ्ठल मंदिर नानापेठ ,पुणे तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विठोबा मंदिर, पुणे येथे मुक्काम करणार आहे.

 


दरवर्षी या पालखी सोहळ्यात राज्यभरातून अनेक वारकरी सहभागी होतात. टाळ मृदुंगाचा नाद आणि ज्ञानोबा- तुकाराम च्या जयघोषाने काल पुणे अगदी वारीमय झाले होते. पुणेकरांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीचा सामना असल्याने भाविकांच्या दर्शन घेण्यासाठीच्या संख्येवर त्याचा परिणाम दिसून आला. वारकऱ्यांना फळे, बिस्किटांचे वाटप करण्यात आले तसेच पुण्यातील नागरिकांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.

 
दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पुणेकरांनी वारकऱ्यांच्या सेवेची जय्यत तयारी केली होती. पालख्या विसावल्या नंतर काही ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. कपाळावर गंध लावत पुणेकरांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. वारीच्या भक्तिमय वातावरणात पुणेकर भावविभोर झाले होते.