असेही एक काश्मीर..
 महा त भा  19-Jun-2017


गेल्या काही दिवसात जम्मू काश्मीरचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येते ते म्हणजे दहशतवादी हल्ला, गोळीबार, लष्करावर दगडफेक आणि हिंसा. मात्र जम्मू काश्मीर येथे आता सण साजरा होतानाही दिसतोय. जम्मू काश्मीर सांस्कृतिक आणि पर्यटन विभागातर्फे रमजानचा महीना असल्याकारणाने रात्रीचा बाजार भरविण्यात येत आहे. ज्या काश्मीरमध्ये सायंकाळी ६ नंतर शुकशुकाट असतो, त्या काश्मीरमध्ये आता रात्र बाजार भरवून तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन नागरिकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे.काश्मीर येथे मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये हे बाजार भरविण्यात आले आहेत. यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. तसेच पर्यटकांनी देखील येथे स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. या बाजारात खरेदीसाठी अनेक पारंपरिक वस्तु ठेवण्यात आल्या आहेत. हा बाजार इफ्तार पासून संपूर्ण रात्र सुरु आहे.

काश्मीर येथे सततच्या सुरु असलेल्या हिंसाचारापासून, तसेच दगडफेकीसारख्या कृत्यापासून जनतेला परावृत्त करण्यासाठी काश्मीर पर्यटन विभागाचा हा एक उपक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळेला काश्मीर येथील जनता आनंदी असल्याचे आगळे वेगळे चित्र दिसून येत आहे.