'थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ची आज बैठक
 महा त भा  19-Jun-2017


शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंबंधी निकष ठरवण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या 'थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी ४ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.


राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत चर्चेसाठी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे संयोजक डॉ. अजित नवले, बँक कर्मचारी प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी सर्वश्री धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके (माजलगांव) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासर्व शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून कर्जमाफीसाठी नवीन निकष ठरवण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी 'डिजिटल प्लॅटफॉर्म'चा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या द्वारे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट फायदा घेता येईल तसेच व्यवहारात पूर्ण पारदर्शकता देखील येईल, असे ते म्हणाले आहेत.


शेतकरी आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार राज्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन निकष समितीची स्थापना करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही समिती सर्व शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सर्व समस्यांवर आपला अहवाल तयार करेल तसेच कर्जमाफीसाठी काही निकष देखील ठरवेल. यानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व इतर सुविधा पुरवल्या जातील.