सांस्कृतिक वारसा म्हणून 'योगा'ला युनेस्कोची मान्यता
 महा त भा  19-Jun-2017


आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. योगासनांमुळे मानवाला होणारे फायदे तसेच त्याचा इतिहास पाहता युनेस्कोकडून योगाचा समावेश 'इनटॅन्जेबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्यूमॅनीटी'च्या यादीमध्ये करण्यात आला आहे. यासंबंधी युनेस्कोकडून भारताला सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे.


युनेस्कोमध्ये असलेल्या भारतीय राजदूत ऋचिरा कंभोज यांनी या विषयी स्वतः माहिती दिली आहे. कंभोज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या सर्टिफिकेटचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये योगाला मानवतेचा सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताने योगाला सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात योगाला युनेस्कोकडून सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. या संबंधीचे सर्टिफिकेट काल भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कंभोज यांनी या विषयी सर्वांना माहिती दिली.

Embeded Object


येत्या २१ तारखेला भारतासह संपूर्ण जगात 'योग दिवस' साजरा करण्यात येणार आहे. यंदा 'योग दिनाचे' हे तिसरे वर्ष असणार आहे. त्यामुळे भारत सरकारकडून यासाठी मोठ्या प्रमाणत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून सर्व देशवासियांना योग दिनाच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशभरात यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर योग साधनेला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यामुळे या उत्साहात आणखीनच भर पडणार आहे.