Advertisement
सजग नागरिक आणि सक्रीय कार्यकर्त्यांच्यामार्फत ग्राहकांना उत्तम सुविधा द्या-अरुण देशपांडे
 महा त भा  19-Jun-2017

 

राज्यामध्ये ग्राहक चळवळ व या संदर्भातील कायदे सक्षम आहेत. मात्र पुरेशी प्रसिद्धी आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीमध्ये सातत्य आल्यास ग्राहकांना उत्तम सुविधा मिळेल, असे प्रतिपादन राज्य ग्राहक सल्लागार समितीचे व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवनात बैठक संपन्न झाली या बैठकीत ते बोलत होते.

 

या बैठकीमध्ये अन्न व प्रशासन, शिक्षण, आरोग्य, परिवहन, सार्वजनिक वितरण आदी विविध विभागांचा आढावा अरुण देशपांडे यांनी घेतला. यावेळी 1986 च्या ग्राहक संरक्षण कायदा, राईट टू सर्विस ॲक्ट या संदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. वर्षातून किमान दोन बैठका अध्यक्षांच्या नेतृत्वात व्हाव्यात व समितीच्या मार्फत येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांचे निरसन काटेकोरपणे करण्यात यावे. यासाठी प्रशासनाने हयगय करु नये असे अरुण देशपांडे यांनी सांगितले.

यावेळी शहरातील सर्व हॉटेलमध्ये खाद्य पदार्थाविषयी तक्रारी असल्यास सामान्य नागरिकांना लगेच तक्रार करता येईल, यासाठी दर्शनी भागामध्ये ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर (1800222) लावणे बंधनकारक करावे असे, निर्देश त्यांनी दिले. याशिवाय प्रत्येक परवानाधारक हॉटेलमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा करणे संबंधित हॉटेल, रेस्टारेंट यांना बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या संदर्भात येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही केली जाते. तेव्हा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत याबाबतची माहिती पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश बर्फ उद्योग करणारे व्यवसायिक यांच्याकडे अखाद्य बर्फ निर्मिती या गटात उत्पादन केले जाते. त्यामुळे अशा बर्फ उद्योग समुहाकडून तयार झालेला बर्फ वापरणाऱ्या हात ठेलेधारक, हॉटेल व्यवसायिक यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी केले.

Advertisement