'काश्मीरच्या मदतीला या'- अब्दुल मक्कीचे पाकिस्तानी पत्रकारांना आवाहन
 महा त भा  19-Jun-2017


'भारताने काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केला आहे. काश्मीरमध्ये दररोज मानवी हक्कांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानी पत्रकरांनी काश्मीरच्या मदतीसाठी पुढे यावे आपल्या लेखणीच्या बळावर त्यांच्या आंदोलनाला बळ द्यावे' असे केविलवाणे आवाहन मुंबई हल्ल्यात सहभागी असलेला आणि जमात-उद-दावाचा मोहरक्या हाफिज अब्दुल रहमान मक्की याने केले आहे. पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे जमात-उद-दावाकडून पत्रकारांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मक्कीने उपस्थित पत्रकारांना अत्यंत केविलवाण्या स्वरात काश्मीर प्रश्नी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.


जमात-उद-दावाकडून मक्कीच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मक्कीने नेहमी प्रमाणे भारतविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरमधील नागरिकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळाला पाहिजे. तसेच शिमला करारामध्ये भारताने पाकिस्तानची फसवणूक केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदेशीरपणे काश्मीर प्रश्न सोडवला जावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे मक्कीने म्हटले आहे.


याच बरोबर पाकिस्तानच्या सरकारने आतापर्यंत काश्मीर प्रश्न योग्यरित्या हाताळाला नाही, असे म्हणत पाकिस्तान सरकारवर देखील मक्कीने ताशेरे ओढले आहेत. गेल्या ७० वर्षात अनेक वेळा काश्मीरचा मुद्द पाकिस्तानकडून उपस्थित केला गेला परंतु तो योग्यरित्या हाताळला गेला नाही असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे पत्रकारांनी या प्रकरणात लक्ष घालून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी एक विचारिक आंदोलन उभे करावे, असे आवाहन मक्कीने केले आहे.