भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीमध्ये बैठक सुरु
 महा त भा  19-Jun-2017


राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक नवी दिल्ली येथे सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारमधील सर्व वरिष्ठ नेते व पक्ष अधिकारी या बैठकीला उपस्थित झाले आहेत. आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाची रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी पक्षाकडून उमेदवार देखील निश्चित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या बैठकीकडे देशातील सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त डॉ. नसीम जैदी यांनी गेल्या ७ तारखेला दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची नावे ठरवण्यात आली असून ती गुप्त ठेवण्यात आली आहेत. भाजपने देखील अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजप आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतो.

नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, रस्तेमंत्री नितीन गडकरी, पक्ष प्रमुख अमित शहा आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत.