आयुर्वेदिक रेसिपीज- कारवेल्ली फलशाकम्
 महा त भा  19-Jun-2017

आरोग्यदायी फळभाज्या

 

कारवेल्ली फलशाकम् ( कारल्याची भाजी )

संदर्भ :- क्षेमकुतूहल

 

 

 

"आमच्या लहानपणी आम्हाला खाण्या-पिण्याच्या बाबतीत कोणतीही सूट नसायची", असे माझी आई माझ्या लहानपणी नेहमी मला सांगायची. ताटात जे वाढलं जाईल ते खाणे हाच एकमेव "option" असायचा. आम्हीही आमचे लहानपण काहीसे असेच घालवले. असे केल्यामुळे अन्नाविषयी विशेष प्रेम निर्माण झाले. आई बनवेल ते आवडीने खायचे एवढेच आम्हाला माहीत असे.

आजकाल मात्र परिस्थिती थोडी बदललेली दिसते. कितीतरी आई-वडील माझ्याकडे "मुलांना रोज-रोज काय नवीन खायला द्यायचं?" हा प्रश्न घेऊन येतात. प्रश्न खरंच इतका गंभीर आहे का हे चाचपडून पाहायची गरज आहे. रोज-रोज नवीन का करावं लागतं, तर मुलांना घरचं खाऊन कंटाळा येतो आणि त्यांना चमचमीत काहीतरी लागतं म्हणून ! मूळ मुद्दा हा की, आजकाल आपल्याला आहाराच्या विविध प्रकारांबद्धल व त्यांच्या गुण-धर्मांविषयी ज्ञानच राहिलेले नाही. त्यातही मुलांच्या आवडी-निवडींची "लिस्ट" काही संपत नाही. भाज्यांचे एवढे प्रकार बाजारात मिळत असूनही घरात मात्र ठरलेल्या ४-५ भाज्या आलटून-पालटून करणे व दर "weekend" ला मुलांसोबत हॉटेल मध्ये जाऊन जेवणे हा ठरलेला क्रम. अशाने आपल्या पारंपरिक, पौष्टिक आहार-पद्धतींचा कुठेतरी ह्रास होत चालला आहे असे दिसून येते.

नावडत्या भाज्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर जर कुठली भाजी असेल तर ती आहे "कारले"! कडू गोष्टी का खाव्यात? कारण "तिक्त" म्हणजेच कडू गोष्टींची शरीराला तितकीच गरज असते जितकी गोड़ व तिखट रसाची. मुलांना जर का ह्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या तर ते नक्कीच समजून घेतील. पण ह्या गोष्टी त्यांना समज येण्यापूर्वीच सांगितल्या जाव्यात हे नमूद करावेसे वाटते.

भाजी बनवण्याचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कधीतरी बदल म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने तीच भाजी बनवू शकतो. आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये कारल्याच्या भाजीची एक वेगळी पण सोपी "रेसिपी" वाचायला मिळते.

 

साहित्य :-

 

२५० ग्रॅम हिरवी कारली

२०० मि.लि. आंबट ताक

चिमूटभर हळद

चिमूटभर हिंग

फोडणीपुरते ३ चमचे तेल

चवीपुरते शेंदेलोण (मीठ)

१/२ चमचा मिरी पूड

 

वाढणी (Serves):- २

 

कृती :-

 

१. प्रथम कारले कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. कारल्याच्या बिया काढून टाकाव्यात.

२. त्यानंतर कारल्याच्या फोडी ताकात घालून कढईवर झाकण ठेवून साधारण अर्ध्या शिजू द्याव्यात. 

 

 

३. थोड्या शिजल्या कि त्यामध्ये हिंग व शेंदेलोण मीठ घालावे व ढवळावे.

४. तयार कारल्याच्या भाजीत तेल घालून, हळद व मिरी पूड घालून भाजी पूर्णतः शिजवावी.

५. भाजी पूर्ण शिजली कि गरम-गरमच पोळी किंवा वरण-भाताबरोबर सर्व्ह करावी.

 

 

फलश्रुती (फायदे) :-

१. सारक:- मलाचे रेचन करते म्हणजेच पोट साफ करते.

२. रक्तपित्त:- रक्तपित्तासारख्या रक्तस्राव होणाऱ्या विकारांमध्ये कारल्याची भाजी उत्तम काम करते.

३. कामला:- कावीळ असल्यास कारल्याची भाजी नक्की खायला द्यावी, रक्तातील दोष कमी होऊन रक्त शुद्ध होते व उपशय मिळतो.

४. पांडू:- रक्तक्षय असल्यास कारले हे रक्त भरून काढण्याचे कार्य करते.

५. कफजन्यरोग :- कफ दोष वाढून होणाऱ्या आजारांमध्ये कारले पथ्य मानले जाते मात्र पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी कारले प्रमाणात खावे. त्यातल्या त्यात कारल्याची ताकात शिजवलेली भाजी ही थंड असल्यामुळे पित्त प्रकृतीसाठी पथ्यच.

६. मेदोरोग:- शरीरातली चरबी वाढून होणाऱ्या आजारांमध्ये (लठ्ठपणा) कारल्याची भाजी जरूर खावी.

७. कृमी:- कडू चवीमुळे साहजिकच कारले जंतांसाठी उत्तम औषध होय.

 

बाहेरून पाचूप्रमाणे हिरवेगार आणि आतून प्रवाळासारखे लालसर रंग असलेले कारले खरं तर सर्वात उत्तम! पण भाजी घेताना सहसा एवढा "चॉईस" नसल्यामुळे त्यातल्या त्यात हिरवे आणि कोवळे कारले बघून घ्यावे. कारल्याची ही विशेष अशी ताकातली भाजी जरूर करून पाहावी.

 - वैद्य विशाखा मोघे