लंडनमध्ये भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडले
 महा त भा  19-Jun-2017


गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये सुरु असलेल्या हल्ले आणि अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. लंडन शहराच्या उत्तर भागात असलेल्या फिल्सबेरी पार्कमध्ये काल रात्री पुन्हा एकदा एका माथेफिरूने भरधाव ट्रकच्या सहाय्याने ८ जणांना चिरडले आहे. सुदैवाने यात कसलीही जीवित्तहानी झालेली नाही. परंतु ट्रक खाली चिरडलेले नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना लंडनमधील तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. तसेच हा दहशततादी हल्ला असल्याचे पोलिसांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.


ब्रिटेनच्या स्थानिक वेळेनुसार काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी ही घटना घडली. फिल्सबेरी पार्क जवळील सेव्हन सिस्टर्स रोडजवळ असलेल्या एका मशिदीबाहेर या माथेफिरूने नागरिकांना ट्रक खाली चिरडले. यात आठ जण गंभीर जखमी झाले तर इतर दोन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. काही प्रत्यक्षदर्शिनी या घटनेची माहिती तातडीने लंडन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तसेच जखमी नागरिकांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी लंडन अॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले.

Embeded Object


अटक करण्यात आलेला ४८ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर प्रथम त्याची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्याची प्राथमिक चौकशी करून तो कोणत्या दहशतवादी संघटनेचा सभासद आहे का ? याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर सेव्हन सिस्टर्स जवळील सर्व परिसर सील करण्यात आला आहे. तसेच तपासासंबंधीच्या आणखी माहिती अजून पुढे आलेली नाही.


गेल्या एका महिन्याभरातील लंडनमधील ही चौथी मोठी घटना आहे. या अगोदर लंडनमधील मँचेस्टर येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यानंतर लंडनमध्ये लागोपाठ दोन ठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात आले होते. या सर्वांचा विसर पडतोनापडतो तोच ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.