पालखी, रमजान, क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सर्वतोपरि मदत करा - रश्मी शुक्ला
 महा त भा  18-Jun-2017आजच्या दिवशी पालख्यांचे आणि वारकऱ्यांचे आगमन पुण्यात, रमजान चे रोजे सोडण्याची ईप्तारी, आणि क्रिडा प्रेमींकरीता भारत - पाकिस्तान सामना असून त्यासाठी सर्व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे. मात्र अशा परिस्थितीत सर्व पुणेकरांनी पोलिसांना सर्वतोपरि मदत करण्याचे आवाहन पुण पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे.


आजचा दिवस हा पुणे शहराकरिता दुग्धशर्करा योग आहे, या दिवशी ऐतिहासिक परंपरा असलेले, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे व त्यांच्या बरोबर लाखो वारकऱ्यांमध्ये आगमन आपल्या शहरात होत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत ज्यावेळी शहरातील सर्व समाजाचे लोक मग्न असतील, त्याच वेळेत पवीत्र रमझान महीन्यातील रोजे सोडणे कामी असंख्य मुस्लीम बांधव पण तैयारी करत असतील. तसेच त्याच वेळेत भारत व पाकिस्तान यांच्या मध्ये लंडन येथे चॅम्पियन्स ट्राँफी चा अंतिम सामना होत आहे. पोलीस दल सुद्धा यात सामील होणार असून सर्व पुणेकरांनी आजच्या दिवशी पोलिसांना बंदोबस्त करताना सर्वोतपरि मदत करण्याचे आवाहन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे. पोलीस दलामध्येही वारकरी भक्त, रमजान चे रोजे सोडणारे बांधव व क्रिडा प्रेम असणारे असंख्य क्रीडा प्रेमी पोलीस आहेत, त्यामुळे सर्वांनी काळजी घेत आजच्या दिवसाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.


क्रिकेट च्या सामन्या पेक्षा आपल्या माऊलींचा पालखी सोहळा आणि वारकरी बांधवांची सुरक्षा नक्कीच महत्वाची आहे, याचे भान ठेवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तसेच कोणतीही अडचण भासल्यास त्वरित नजीकच्या पोलीसांना अथवा १०० नंबरवर संपर्क करावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.