माऊलींच्या पालखीचे आज पुण्यात आगमन
 महा त भा  18-Jun-2017टाळ मृदुंगाचा गजर, माऊलींच्या नावाचा जयघोष, वैष्णवांचा मेळा, अशा भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहेत. राज्याचे सांस्कृतिक वैभव म्हणून वारीची ओळख आहे. 'ग्यानबा तुकाराम', 'पुंडलिक वरदा हारी विठ्ठल' च्या जयघोषात असंख्य भाविक उत्साहाने वारीत सहभागी झाले आहेत.


काल आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान झाले. तर परवा देहूमधून संत तुकारामांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी, पिंपरी, विठ्ठ्लनगर, कासारवाडी, शिवाजनगर, फर्गयूसन कॉलेज रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक येथून प्रस्थान करत आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून विठ्ठल मंदिर, नानापेठ, पुणे येथून प्रस्थान करत आहे. सोमवारी या दोन्ही पालख्या पुण्यात आपला मुक्काम करणार असून मंगळवारी सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील.


पालखी प्रस्थानाचा हा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी भाविकांची नेहेमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळते. यामुळेच आज पुण्यातील वाहतूकीच्या मार्गात आज बदल करण्यात आल आहे. वाहनचालकांनी पालखीच्या मार्गात वाहने आणू नयेत असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच दुपारनंतर ज एम रोड, एफ सी रोड, लक्ष्मी रोड हे रस्ते आकश्यक्ता असल्यास बंद केले जाणार आहेत.