भारत- पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर येथे 'हाय अलर्ट'
 महा त भा  18-Jun-2017जम्मू काश्मीर येथे गेल्या अनेक महीन्यांपासून तणावाचे वातावरण आहे, तसेच मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले झाले आहेत. पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन देखील केले आहे. त्यामुळे आज असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर येथील सुरक्षा रक्षकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सामन्याच्या निकालामुळे काश्मीर येथे विपरीत घटना घडण्याची किंवा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Embeded Object


जम्मू काश्मीर येथे वाढत्या दहशतवादी कारवाया बघता लष्करातर्फे मोठे अभियान सुरु करण्यात आले होते. यामध्ये दहशतवाद्यांचा छडा लावून त्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाक सामन्यात पाकिस्तान हरल्यास येथे विपरीत घटना घडण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.  त्याच पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या नूरबाग, नौहट्टा आणि ईदगाह या भागांमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीर येथील दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी सब्जार भट्ट आणि जुनैद मट्टू यांचा देखील समावेश आहे. तर दहशतवाद्यांनी देखील १३ जून रोजी लष्करी तळावर हल्ले केले होते. त्यामुळे आजच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.