संपूर्ण बीड जिल्हा राष्ट्रवादीमय झाला आहे : धनंजय मुंडे
 महा त भा  18-Jun-2017बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा हा वेगळा असून संपूर्ण जिल्हा हा राष्ट्रवादीमय झाला आहे. कोणत्याही लाटेची पर्वा न करता आगामी काळात मराठवाड्यातील परळीसह सर्वच्या सर्व सहा जागा ह्या राष्ट्रवादी पक्षाकडे असतील असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा दरम्यान व्यक्त केला.


पक्षाची एकजूट बांधणी करण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा काल मराठवाड्यात पार पडला. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्येक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रयत्नाने बीड मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.


महानगर पालिकेत विरोधकांनी कितीही पैसा वाटला तरी देखील लोकांनी पक्षावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी पक्षाला २५ जागा जिंकून दिल्या त्या साठी त्यांनी लोकांचे आभार मानत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचाच विजय होऊल असा विश्वास मुंडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.

 

या मेळाव्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला सुरक्षावर प्रश्न उपस्थित करत महिलांवर अत्याचार होत असल्याचे म्हटले. याला विरोध करत राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला हवा असे त्या म्हणाल्या. तसेच महिला आणि बालकल्याण खाते बीड जिल्ह्याकडे असून सरकारचे याकडे लक्ष नाही असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.


या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस सुनील नाथ, मनसेचे दादासाहेब गव्हाणे, शिवसेनेचे भाऊसाहेब गावकर, विजय खंडागळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, आमदार शंकर अण्णा धोंडगे, जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश सोळंके व पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.