काळ्या-पिवळ्या टॅक्सी येणार एका क्लिकवर
 महा त भा  18-Jun-2017’ओला’ आणि ’उबेर’ या खासगी टॅक्सीला टक्कर देण्यासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सी स्पर्धेच्या मैदानात उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ’ओला’-’उबेर’ विरुद्ध काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे ’ओला’-’उबेर’प्रमाणे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय काळ्या-पिवळ्या टॅक्सी युनियनने घेतला आहे. यासाठी युनियनने एक ‘ऍप’ तयार केले असून या ‘ऍप’वर जवळपास ३००० टॅक्सी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


मुंबई शहर, तसेच उपनगरांमध्ये ज्याप्रमाणे ’ओला’ आणि ’उबेर’ची सेवा ऑनलाईन पद्घतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता अशाच प्रकारची सेवा आता काळ्या-पिवळ्या टॅक्सी देणार आहे. अतिरिक्त भाडे आकारणे, टॅक्सीचालकांच्या उर्मटपणाला कंटाळलेले प्रवासी आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीला नापसंती दर्शवू लागले आहेत. त्यातच गेल्या दोन वर्षांमध्ये ’ओला’ आणि ’उबेर’च्या सेवेला प्रवासी पसंती देऊ लागले आहे. वेळेची आणि पैशाची बचत करणार्‍या ’ओला’ आणि ’उबेर’चा व्यवसाय सध्या जोमात सुरू आहे; परंतु या सगळ्याचा परिणाम काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. त्यामुळे काळानुसार आपल्या सेवेमध्ये काही बदल करण्याचा निर्णय टॅक्सी युनियनने घेतला आहे. दरम्यान, युनियनने सुरू केलेल्या या ‘ऍप’ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दि.२९ जूनपासून ही सुविधा प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, ही ऍपची सेवा दि. १ जूनपासून सुरू करण्यात येणार होती. राज्यभरात रिक्षा-टॅक्सी यांची दरनिश्चिती करण्यासाठी राज्य सरकारने ’खटुआ समिती’ची स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ही समिती टॅक्सी आणि रिक्षांचे दर साधारण किती असावे हे ठरविण्याची संधी टॅक्सी युनियन संघटना, रिक्षा संघटना, तसेच प्रवाशांना देण्यात येणार होती. परंतु ’खटुआ समितीला हा अहवाला देण्यास विलंब झाला.परिणामी ’काळ्या-पिवळ्या’ टॅक्सीसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ‘ऍप’चे उद्घाटन रखडले होते.परंतु,आता प्रवाशांना ही ऍपची सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईकरांना दिलासा


क्वाड्रोस यांनी सांगितले की, ’’ मोबाईलवर ही ‘ऍप’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी लागणारे शुल्क सामान्य मुंबईकरांच्या खिशाला परवडेल असेच ठेवण्यात आले आहे. तसेच मुंबईत कोणत्याही कारणांसाठी अतिरिक्त टॅक्सीची गरज भासल्यास अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत. तसेच ‘कॅब’ची बुक केल्यानंतर २२ मीटर याप्रमाणेच शुल्क घेण्यात येणार आहे.


मुंबईकरांच्या सोईसाठी हे ऍप तयार करण्यात आले आहे. सुरुवातील या ३,००० टॅक्सींचे चालक ही सुविधा प्रवाशांना देणार आहेत. त्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादाप्रमाणेच टॅक्सीचालकांची संख्या वाढविण्यात येईल.या ऍपमुळे काळया-पिवळया टॅक्सीला मुंबईकर पुन्हा पसंती देतील अशी अपेक्षा आहे.
एल. एल. क्वाड्रोस, महासचिव, मुंबई टॅक्सी युनियन