पेन्शन, शिष्यवृत्ती, शासकीय योजनांच्या लाभासाठी आता नवे संकेतस्थळ!
 महा त भा  17-Jun-2017१ जुलैपासुन सुरू होणार सेवा


राज्यसरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन, मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या विविध शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी आता लाभार्थ्यांना ताटकळत राहावे लागणार नाही. राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये विना अडथळा जमा होईल. १ जुलैपासुन ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

शासनाची लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम अन्य व्यक्तीला मिळु नये, यासाठी आता शासन सतर्क झाले आहे. आपले सरकार या संकेतस्थळाला लाभार्थ्याचे आधारकार्ड जोडले जाणार आहे. त्यासाठी बायोमेट्रीक पध्दतीचा अवलंब करुन वन टाईम पासवर्ड दिला जाणार आहे. या सुरक्षितेमुळे शासन आणि संबंधीत व्यक्तीची फसगत टळेल, असा दावा शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग अधिकाऱ्याने केला आहे. पेन्शन, शिष्यवृत्ती, व शासकीय योजनांची रक्कम मिळण्यास लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. संबंधित विभागाकडुन अनेकदा पेन्शन पाठविण्यास विलंब होतो. बँक खात्याचा क्रमांक देऊनही भलत्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये पेन्शन जमा झाल्याच्या घटना घडत आहेत. आपल्या हक्काची रक्कम मिळविण्यासाठी सेवानिवृत्तांना शासकीय कार्यालये व बँकांमध्ये खेटे मारावे लागतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासही अनेक अडचणी येतात. काही शैक्षणिक संस्थांनी एकाच विद्यार्थ्यांच्या नावाने अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश दाखवुन शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकार नुकतेच उघडकीस आले होते. अशा घटनांमुळे गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा सरकारचा उद्देश साध्य होत नाही. सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार, पिडीत व विधवा महिला, अपंग व्यक्तींसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातुन दिली जाणारी आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. लाभार्थी मृत झाल्यानंतरही त्याच्या नावे मिळणारी रक्कम हडप केली जाते. लाभार्थी बाहेरगावी गेल्याचे संधी साधुन त्याच्या खात्यावरील रक्कम परस्पर काढण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसून आपले सरकार या नव्या संकेतस्थळावरील ही सेवा लाभार्थ्यांना वरदान ठरणार आहे.

 


हर्षना रोटकर