दार्जिलिंग आंदोलन चिघळले, अनेक पर्यटकांची तारांबळ
 महा त भा  17-Jun-2017

दार्जिलिंग येथे गोरखा जनमुक्ती मोर्चा शनिवारी देखील सुरूच आहे, गोरखालँडच्या मागणीमुळे सुरु झालेले हे आंदोलन तेथील स्थानिक जनजीवनावर पडसाद उमटवत आहेत. आजही तेथील दैनंदिन जीवन ठप्पच पडलेले होते. गोरखालँडच्या मागणीमुळे मोर्चा स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे वळला असून तेथेच आंदोलक ठिय्या करून बसलेले होते.

तेथे जमलेली गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे अश्रुधारांचा प्रयोग करावा लागला असून, आंदोलन हिंसक होऊ नये याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका पर्यटकांना होत असून, तेथे आलेल्या पर्यटकांसाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. दार्जिलींग, सिलीगुडी येथे मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असतात, मात्र गोरखा जनमुक्ती मोर्चाने पुकारलेल्या बंदमुळे पर्यटकांची तारांबळ उडत आहे. अनेक पर्यटक यात अडकले असून परिस्थिती शांत होण्याची वाट बघत आहेत. त्यातच अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना परिसर सोडून जाण्यास सांगितले आहे.

दरम्यान स्वतंत्र गोरखालॅंड राज्यासाठी सुरु असलेला संघर्ष आम्ही असाच सुरु ठेवू, ममता बॅनर्जी सरकार आमचा आवाज दाबू शकत नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विशेषतः आंदोलनाचे नेते बिमल गुरुंग यांच्या घरावर आणि संपत्तीवर छापे घातल्यानंतर तर आंदोलन असेच सुरु ठेवण्यासाठीची रणनिती आखण्यासाठी सर्व गोरखा संघटना एकत्र आल्या आहेत. गोरखा समाज देशविरोधी नाही त्यामुळे निमलष्करी दल किंवा लष्कर पाठवून आमचे आंदोलन चिरडले जाऊ नये असे आंदोलकांनी सांगितले आहे. ममता बॅनर्जी सरकारने ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यामुळे हे आंदोलन अजून चिघळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस आणि निमलष्करी दलांकडून आंदोलकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिप्स आणि छायाचित्रे सोशल मीडियावरून अधिकाधिक लोकांपर्यंत पसरवली जात आहेत. तसेच त्यासाठी सोशल मीडियावर #ISupportGorkhaland #ShootMe #MamtaMurderer #DoOrDieForGorkhaland #NowOrNeverGorkhaland #WeWantGorkhaland अशा प्रकारचे ट्रेंडस् देखील निर्माण केले गेले आहेत.

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी याबाबत मात्र वेगळीच भूमिक घेतली आहे. हे आंदोलन म्हणजे काही गुंडांचा पुंडावा असून गोरखालँडसाठीचा हा बंद बेकायदेशीर आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपला पक्ष असल्या कोणत्याही बेकायदेशीर आंदोलनाचे अजिबात समर्थन करत नाही असे बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. मात्र केवळ आंदोलन बेकायदेशीर आहे एवढे म्हटल्याने प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी आंदोलकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे सांगत विरोधकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

Embeded Object