भारतीय मसाले निर्यातीत १२ टक्के विक्रमी वाढ
 महा त भा  17-Jun-2017

मिरची आणि जिरे यांना परदेशात मोठी मागणी


 

संपूर्ण जगभरामधील देशांनी अन्न सुरक्षा नियम अधिक कडक केले असले तरीही भारतीय मसाल्यांना बाहेरच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे देशाच्या मसाल्यांच्या पदार्थांच्या निर्यातीत २०१६-१७ मध्ये विक्रमी वाढ नोंदवली आहे. भारताने २०१६-१७ मध्ये १७ हजार ६६४.६१ कोटी रुपयांचे मसाले निर्यात केले आहेत.

भारतात उत्पादित होणाऱ्या मिरचीला बाहेरच्या अनेक देशांकडून मोठी मागणी असून २०१५-१६ मध्ये भारताने ८ लाख ४३ हजार २५५ टन मिरची निर्यात केली. या मिरचीची किंमत १६ हजार २३८.२३ कोटी आहे. मिरचीला असलेली मागणी सातत्याने वाढत आहे. मिरचीच्या निर्यातीमध्ये यावर्षी १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज आहे.

मिरचीच्या खालोखाल जीरे या मसाल्याच्या पदार्थाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. २०१६-१७ मध्ये भारताने १ लाख १९ हजार टन जिरे निर्यात केले. या जिऱ्याची किंमत १ हजार ९२३.२० कोटी रुपये आहे. यंदा जिऱ्याच्या किंमतीतही वाढ अपेक्षित आहे.

जागतिक बाजारपेठेत “औषधी” म्हणून वापरण्यासाठी भारतीय हळदीला प्रचंड मागणी आहे. भारतीय हळदीचा वापर परदेशातल्या वेगवेगळ्या औषध कंपन्या करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हळदीची मागणी नोंदवली जात आहे. २०१६-१७ मध्ये १ लाख १६ हजार ५०० टन हळद भारताने निर्यात केली.

गेल्या वर्षीपेक्षा भारतीय बडीशेप यंदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली. बडीशेपेच्या निर्यातीमध्ये १२९ टक्के वृद्धी नोंदवली गेली आहे. याचबरोबर लसूण, जायफळ यांना असलेल्या मागणीमध्येही सातत्याने वाढ होत असल्यामुळे त्यांच्या निर्यातीतही वाढ होत आहे.