ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आज आळंदीहून प्रस्थान
 महा त भा  17-Jun-2017


 
आषाढी एकदशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ते म्हणजे "ज्ञानबा तुकाराम" चा जयघोष करणारे वारकरी, आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. आज पासून आषाढी वारीला सुरुवात होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज आळंदी येथून दुपार ४ च्या सुमारास प्रस्थान होणार आहे.


या पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्यभरातून अनेक वारकरी सहभागी होत असतात. वारीची संपूर्ण पूर्वतयारी देखील झाली आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून वारकरी या पालखीत सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येत वारकरी सहभागी होतील असे चित्र दिसून येत आहे.

 

 

 टाळ मृदुंगाच्या नादात आणि ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या जयघोषाने अवघा परिसर दणाणून जातो. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रमाणे कालच तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. ३ जुलै रोजी तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होत असल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न देखील निर्माण होतो, त्यासाठी निर्मल वारी अभियान व इतर स्वच्छता अभियान देखील राबविण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था देखील करण्यात आली.