पाकिस्तान सोबत असलेला सामना अन्य सामन्या सारखाच : कोहली
 महा त भा  16-Jun-2017



चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल झालेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत मजल गाठली आहे. आता भारताचा सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. भारत-पाक सामना नेहमीच सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. हा खेळ नसून आता ती परंपरा झाली आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे मत वेगळे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार 'भारत-पाक' सामना हा इतर कुठल्या देशाशी असलेल्या सामन्या सारखाच आहे, त्याचं दडपण आम्ही घेतलेलं नाही." काल जिंकल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याने हे मत व्यक्त केले आहे.

'मला माहीत आहे माझे हे वक्तव्य तुम्हाला नीरस वाटेल मात्र हेच सत्य आहे. आमच्यासाठी हा सामना इतर कुठल्याही सामन्याप्रमाणेच आहे. आम्ही त्याचे दडपण घेतलेले नाही. आम्ही आमच्या परीने उत्तम कामगिरी करण्याचाच प्रयत्न करु." असेही त्याने म्हटले आहे.

या आधीच्या फेरीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. तसेच संपूर्ण स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी उत्तमच राहीली आहे, त्यामुळे भारतीय संघाकडून देशवासियांना खूप अपेक्षा आहेत. तसेच भारत-पाक सामना असल्याने भारताने जिंकायलाच हवे असा देशवासियांचा आग्रह आहे. तरी देखील भारतीय संघाने हुरळून जावू नये. तसेच इतर कुठल्यासंघाप्रमाणेच हा सामना असला, तरी भारताला जिंकण्याशिवाय काही पर्याय नाही, हे ध्यानात ठेवावे, अशी देशवासियांची भावना आहे.