जुळ्या बहीणींचा मृत्यु देखील एकत्रच
 महा त भा  16-Jun-2017
दिल्लीच्या गुडगाँव येथे एक विचित्र घटना घडली आहे. मेरठ येथील दोन जुळ्या बहीणी हर्षा आणि हर्षिता (वय ५ वर्षे) यांचा मृत्यु देखील एकत्रच झाला आहे. गुडगाव येथे आपल्या आजी आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या हर्षा आणि हर्षिता या घरातील मागच्या अंगणात एका जुन्या गाडीत खेळत असताना गाडीचे दरवाजे अचानक बंद झाले, आणि आत अडकल्याने गुदमरुन या दोन्ही बहीणींचा मृत्यु झाला.
गुडगावच्या जमालपुर या गावातील पटौदी भागात हर्षा आणि हर्षिता सिंह आपल्या आजी आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्या होत्या. त्यांचे वडील गोविंद सिंह भारतीय लष्करात कार्यरत आहेत. हुंडई कार मध्ये खेळत असताना अचानक दरवाजा बंद झाला. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दिलेल्या माहीतीनुसार त्या गाडीचा लॉक आतून खराब झाल्याने ही घटना घडली. दोन्ही मुली खोडकर असल्याने त्या कुणालाही न सांगता कारमध्ये खेळायला गेल्या. मात्र अचानक दरवाजा बंद झाल्याने आणि खिडकी न उघडू शकल्याने आतच गुदमरून त्यांचा मृत्यु झाला.

या दोन्ही मुली मेरठ येथील केंद्रीय विद्यालयात शिकत होत्या. "जुळ्या मुलींच्या जन्माने आमच्या परिवारात आनंद पसरला होता, मात्र त्या इतक्या लवकर ते ही एकत्रच, आम्हाला सोडून जातील असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता." अशा भावना जुळ्या बहीणींचे वडील गोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच पालकांनी डोळ्यात तेल घालून आपल्या लहान मुलांकडे लक्ष दिले पाहीजे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.