समरसतेचे कृतीशील चिंतक - बाळासाहेब देवरस
 महा त भा  16-Jun-2017


 

हिंदू समाज एकात्म-एकरस-समतायुक्त आणि शोषणमुक्त बनविण्याचे स्वप्न रा. स्व. संघाने पाहीले आहे. समाजाला लागलेली विषमतेची, जातीयतेची कीड घालवावी लागेल यासाठी संघाने अनुसरलेली पद्धती जरा निराळी, कृतीला अधिक प्राधान्य देणारी आहे. आपल्या संस्थापनेपासूनच अत्यंत स्वाभाविकपणे आपल्या स्वयंसेवकांमध्ये सर्वांच्याप्रती बंधुभावना रुजविण्याचे काम संघाने केले आहे. सुरुवातीच्या काळात विषमतानिर्मूलन हा भाषणाचा किंवा तत्वचिंतनाचा विषय न करताही हा संस्कार संघ आपल्या कार्यकर्त्यांत रुजवू शकला याचे कारण संघ नेतृत्वाने स्वत:च्या उक्ती व कृतीतून सामाजिक समरसता विषयाला दिलेले प्राधान्य!

सामाजिक समरसता विषयाला गतिमान करण्याचे श्रेय नि:संदिग्धपणे तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांना जाते. अनेक सामाजिक आंदोलने व प्रसंगी विद्रोह-संघर्ष घेऊन लढलेले समतेचे लढे; त्याचे समाजमानसावर झालेले परिणाम या पार्श्वभूमीवर पू. बाळासाहेबांनी ‘जन्मावर आधारित भेदभाव करणार्‍या सर्व रूढी परंपरांचा’ निषेध केला. एवढ्यावरच न थांबता लक्षावधी स्वयंसेवकांच्या मनामधे समाजाप्रती बंधुत्व जागृत केले. सामाजिक अन्यायाचा व विषमतेचा बळी असलेल्या वंचीत बांधवांसाठी सहस्रावधी सेवाकार्ये संघाने सुरू केली आहेत. त्यांना गती देण्याचे महान कार्यही पू. बाळासाहेबांनी केले.

लहानपणासूनच संघाच्या वातावरणात त्यांनी सामाजिक समता अनुभवली. शिवाशिव पाळण्याच्या कालखंडात कुमार वयीन मधुकर (बाळासाहेब) आपल्या शाखेतल्या मित्रांना घरी जेवायला नेत असे. त्यात निरनिराळ्या जातीतील स्वयंसेवक असत. त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई या सगळ्यांना एकाच पंगतीला, थेट स्वयंपाकघरात बसवून जेवायला वाढत. “जेवणानंतर माझे पान जर तू उचलशील तर माझ्या मित्रांचे ही उचल” असा आग्रह मधुकर आईकडे धरीत असे. कट्टर जातीभेदाच्या काळात सर्वांना सन्मान व बरोबरीची वागणूक याबद्दलची दक्षता त्यांच्या वागणुकीत दिसत असे.

पुढे रा. स्व. संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्यानंतर या विषयातले मार्गदर्शन त्यांनी ठिकठिकाणी केल्याचे आपल्याला दिसते. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील त्यांचे गाजलेले व्याख्यान ‘सामाजिक समता व हिंदू संघटन या विषयावर होते’. ‘‘आपल्या समाजातील उणिवा, दोष यांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुसलमान, इंग्रज यांना दोष देऊन आपली सुटका होणार नाही. अनेक शतकांच्या उलथापालथी मध्ये या देशातील लोकांनी शाश्वत जीवन मूल्ये टिकवून ठेवली आहेत. या शाश्वत मूल्यांचा, संस्कृतीचा अभिमान ठेवायचा पण त्याचबरोबर आपल्यामध्ये आलेले दोष, उणिवा, विषमता यांचाही विचार करायचा. त्याबरोबरच जुने सर्वच चांगले ते अपरिवर्तनीय असा विचार करून चालणार नाही. एखादी गोष्ट जुनी आहे एवढ्याचमुळे ती चांगली आहे असे ठरत नाही. ‘आमच्या बापजाद्यांची ही विहीर आहे- तिचे पाणी खारे आहे पण आमचे बापजादे तर तेच पीत आले; त्यांच्यात तर काही दोष निर्माण झाला नाही मग आता आम्हीही तेच का पिऊ नये?’ असा विचार चूक आहे! ज्यांना समाजातील दोष नाहीसे करून संघटन करायचे आहे त्यांनी; ‘चांगले ते टिकवणे व वाईट ते टाकून देणे’ असा विवेक करून पुढे गेले पाहिजे.”

याच ऐतिहासिक व्याख्यानात पू. बाळासाहेबांनी ‘‘जातीव्यवस्था ही व्यवस्था राहिली नसून अव्यवस्था झाली आहे. ती विकृती आहे व ती संपूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे” असे स्पष्टपणे सांगितले. ‘‘सामाजिक विषमतेचा एक आविष्कार अस्पृश्यता हा आहे. आपल्या समाजातील हा अत्यंत दुखदायक व दुर्दैवी प्रकार आहे. अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel! ती सर्वोतोपरी गेली पाहिजे,” असे सांगून ते पुढे असे म्हणाले की, “अमेरिकेत गुलामगिरी घालविणार्‍या अब्राहम लिंकन ने ज्याप्रमाणे If slavery is not wrong, nothing is wrong असे म्हटले तसेच आम्हीही म्हणतो की If Untouchability is not wrong, nothing is wrong!”

“दलित बंधूंना समाजात शतकानुशतके फार त्रास झाला आहे त्याची वेदना त्यांच्या मनात आहे... त्याची पीडा आपल्या सर्वांच्या मनात आहे... मी असे धरून चालतो की आपल्या दलित बंधूंना करुणा नको आहे त्यांना बरोबरीचे स्थान हवे आहे आणि ते त्यांना आपल्या पुरुषार्थाने मिळवायचे आहे. आतापर्यंत ते मागे राहिले असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सवलती देणे आवश्यक आहे. त्या सवलती मागणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्या सवलती किती काळ ठेवायच्या हाही त्यांचाच प्रश्न आहे” या शब्दांमधे त्यांनी मांडलेली भूमिका पुढे अनेकांच्या प्रेरणेचा विषय ठरली. वनवासी, उपेक्षित, दलितांच्या साठी सुरू केलेल्या सेवा कार्यांचा देशव्यापी यज्ञ याच भूमिकेतून सुरू होता व आहे.

पू. बाळासाहेबांच्या जीवनातील सामाजिक समरसतेचे प्रगटन करणारे प्रसंग अनेक आहेत. असे प्रसंग आणि त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यातून त्यांची बंधुत्व जागरणा विषयीची आत्मीयता प्रगट होते. उपेक्षित बांधवांसाठीच्या सेवा कार्यामधूनच सामाजिक समरसतेचा मार्ग प्रशस्त होईल असे त्यांचे मार्गदर्शन असायचे. या संबंधीची एक अत्यंत हृदयस्पर्शी आठवण संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अनंत पंढरे यांनी सांगितली. या संस्थेचे, संस्थेच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे उद्घाटन पू. बाळासाहेबांच्या उपस्थितीत झाले होते. आरोग्य सेवेबरोबरच शहरातील दलित, उपेक्षित बांधवांसाठीच्या सेवाकार्यांची मोठी शृंखला या संस्थेने उभी केली. पुढे अनेक वर्षांनी, पू. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांमध्ये, डॉ. पंढरे त्यांना भेटायला पुण्याला गेले. त्यांनी संस्थेच्या कामाची एक चित्रफीत पू. बाळासाहेबांना दाखवली. पू. बाळासाहेबांचे स्वास्थ्य अजिबात ठीक नव्हते; बसणे-बोलणे पण कष्टप्रद होत होते. चित्रफितीमधील सेवावस्तीतील कामाचे चित्रण संपल्या नंतर त्यांनी खुणेने तो भाग परत दाखवायला सांगितला. ते पहात असतांना त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मोठ्या कष्टाने एक एक शब्द उच्चारात ते म्हणाले “हे...खरे...काम...!”

आज या विषयात रा.स्व. संघाचे काम प्रभावी आणि सर्वश्रूत होत असताना समरसतेच्या या कृतीशील चिंतकाचे योगदान वारंवार आठवत राहते.

डॉ. प्रसन्न पाटील