विनयभंगाच्या आरोपांवरून 'टि.व्हि.एफ.'चा संस्थापक अरुणभ कुमारचा राजीनामा
 महा त भा  16-Jun-2017

'द व्हायरल फीव्हर'चा संस्थापक संचालक आणि सध्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणभ कुमार याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर त्याच्याच एका माजी सहकारी कर्मचारी महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता तेव्हापासून तो सातत्याने चर्चेत होता. मात्र मुंबईसह अन्य तीन ठिकाणी त्याच्यावर विनयभंग आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे नाईलाजास्त त्याला आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

आपल्यावर झालेले आरोप हे निराधार असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे अरुणभने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये म्हटले आहे. मी 'टी.व्ही.एफ.'साठी कसून मेहनत घेत आहे हे काही जणांना बघवत नसून सत्य काय आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल असे त्याने ट्वीटरवरील आपल्या जाहीर पत्रात लिहीले आहे.

Embeded Object

मार्च महिन्यात अरुणभच्याच एका सहकारी कर्मचारी महिलेने 'द मीडियम' या संकेतस्थळावर आपल्या 'इंडियन फॉवलर' या ब्लॉगमध्ये अरुणभने आपल्याशी कसे सातत्याने दोन वर्षे गैरवर्तन केले याविषयी लिहिले. त्यानंतर या विषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले. या लेखात तिने आपण एका वेबसिरीजसाठी अरूणभच्या संपर्कात प्रथम आल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर अरुणभने सातत्याने काही ना काही कारणाने आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप तिने या लेखात केला आहे. 'द मीडियम' ने मात्र खूप गदारोळ झाल्यानंतर हा ब्लॉग आपल्या संकेतस्थळावरून काढून टाकला आहे.  या आरोपावर 'टी.व्ही.एफ.'ने तातडीने स्पष्टिकरण करणारे उत्तरही दिले. मात्र आरोप करणाऱ्या महिलेच्या समर्थनार्थ अन्यही काही महिला पुढे आल्यामुळे अरुणभ समोरील समस्या वाढल्या.

'द व्हायरल फिव्हर' कंपनीसोबत काम करणाऱ्या अन्य दोन महिला कर्मचाऱ्यांनीही पुढे येत 'इंडियन फॉवलर'च्या लेखिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. आयुषी अगरवाल आणि रीमा सेनगुप्ता या महिलांनीही आपापल्या फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावरून आपल्यासोबत अरुणभने केलेल्या गैरप्रकारांचे पाढे वाचले आहेत. तसेच ब्लॉग लेखिकेने घाबरून न जाता या पुढे लढावे व अरुणभला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नये अशा आशयाच्या पोस्टस् लिहिल्या आहेत. दरम्यान आरोप करणाऱ्या महिलेने आपण यासंदर्भात मुंबईत गुन्हा दाखल केला आहे तसेच अन्यही दोन पीडित महिलांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले असल्याचा उल्लेख आपल्या नव्या लेखात केला आहे.