गोष्ट 'अंकल सॅम'ची
 महा त भा  16-Jun-2017


 

लाल रंगाची पँट, तीवर पांढरे उभे पट्टे, निळा टेलकोट, त्यातून दिसणारा पांढराशुभ्र शर्ट, गळ्याशी लाल रंगाचा बो, सफाचट मिशी, पण भुरभुरणारी पांढरी दाढी. टोकदार नाक, बसके गाल आणि डोक्यावर लांबोडी, मोठी पांढरी हॅट तिच्यावर तार्‍यांचा आडवा पट्टा...

हे सारे वर्णन आहे अंकल सॅमचं. अंकल सॅम म्हणजेच अमेरिका ! जगभरच्या वृत्तपत्रसृष्टीत रेखाचित्रं, व्यंगचित्रं यातून प्रत्येक देशासाठी एखादं प्रतीक चिन्ह वापरण्याची पद्धत आहे. जसं रशिया म्हणजे भलंदांडगं अस्वल, चीन म्हणजे ड्रॅगन तसं अंकल सॅम म्हणजे अमेरिका.

पण हे प्रतीक कसं आणि का निर्माण झालं? अशा नावाचा कुणी इसम खरोखरच अस्तित्वात होता का? होय, अंकल सॅम नावाचा इसम खरोखरच होऊन गेला, तो अमेरिकन राष्ट्राचं प्रतीक कसा बनला, त्याची वेगळीच गंमतीदार कथा आहे.

 

त्याचं खरं नाव ‘सॅम विल्सन’ मॅसेच्युसेट्‌स प्रांतात आलिंग्टन या ठिकाणी सन १७६६ साली सॅम विल्सन जन्मला. पुढे लवकरच अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. सॅम विल्सन आपल्या गावातल्या बँड पथकात ड्रम वाजविणारा पोर्‍या म्हणून काम करीत होता. १७७५ साली त्याच्या गावाकडे ब्रिटिश सैन्य आगेकूच करीत येताना त्याने पाहिलं. जोरजोरात ड्रम वाजवून त्याने अमेरिकन सैन्याला सावध केलं. ‘रेड कोट्‌स’ या ठिकाणी अमेरिकनांनी ब्रिटिशांना थोपवलं, या छोट्याशा पण महत्त्वाच्या कामगिरीबद्दल छोट्या सॅमचं खरंच कौतुक झालं.

वयाच्या १४ व्या वर्षी सॅम रीतसर सैन्यात दाखल झाला आणि स्वातंत्र्यलढ्यात उत्साहाने लढला. पुढे स्वातंत्र्य मिळालं आणि मग १७८९ साली सॅम आलिंग्टनहून न्यूयॉर्क प्रांतात ट्रॉयला आला. तेथे त्याने मांस पुरवठ्याचं म्हणजे खाटिकाचं दुकान उघडलं.

 

अमेरिका हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेले असलं तरी अजून ते स्थिरस्थावर झालेलं नव्हतं. अनेक प्रांत असूनही अमेरिकन संघराज्यात सामील झालेले नव्हते. त्यातून छोट्या-मोठ्या कटकटी, युद्धं उद्‌‌भवत. १८१२ साली असंच एक युद्ध झालं. या वेळेपर्यंत सॅम विल्सनचं ट्रॉयमधलं खाटिकाचं दुकान चांगलंच भरभराटीला आलेलं होतं. यात त्याच्या मालाच्या चोखपणा इतकाच त्याच्या विनोदी आणि उत्साही स्वभावाचाही मोठा वाटा होता. ट्रॉयमधलं बारकं पोरदेखील सॅमला आता ‘अंकल सॅम’ म्हणून ओळखू लागलं होतं.

 

१८१२ सालच्या युद्धात लष्कराची एक छावणी ट्रॉयजवळ पडली. छावणीला मांस पुरविण्याचं कंत्राट सॅमकडे चालत आलं. लष्कराला पुरवठा करण्याचे मांसाचे मोठमोठे कंटेनर सॅम जातीने देखरेख करून भरून घेई आणि ते इतर मालाबरोबर मिसळू नयेत म्हणून त्यांच्यावर भल्यामोठ्या अक्षरात लिहीलं ‘यू. एस’ म्हणजे ‘युनायटेड स्टेट्‌स’ म्हणजेच, ‘हे कंटेनर फक्त अमेरिकन लष्करासाठी आहेत.’

एक दिवस म्हणजे अगदी काटेकोरपणे सांगायचं, तर १ ऑक्टोबर, १८१२ या दिवशी लष्कराचे तपासनीस सॅमचं दुकान तपासायला आले. लष्कराला पुरवला जाणारा माल उत्कृष्ट प्रतीचा आहे ना, हे त्यांना तपासायचं होतं. योगायोगाने सॅम दुकानात नव्हता. त्याच्या व्यवस्थापकासह दुकान गोदाम यांची तपासणी करीत असताना तपासणी अधिकार्‍याने विचारलं, ‘‘लष्कराला पुरवायच्या खोक्यांवर ‘यू. एस’ लिहिण्याचं काय कारण?’’ व्यवस्थापकाने थट्टेने उत्तर दिलं, ‘‘मालकांनी बहुधा स्वत:ची आद्याक्षरं खोक्यावर घातली असावीत.’’

 

अभावितपणे करण्यात आलेला हा विनोद तपासणी अधिकार्‍यांना इतका आवडला की, लवकरच सगळ्या लष्करात तो पसरला आणि सैनिक त्यांना पुरविण्यात येणार्‍या सगळ्याच रेशनला अंकल सॅमकडून आलेला शिधा म्हणू लागले. हळूहळू ही गोष्ट फक्त ट्रॉयच्या लष्करी छावणीपुरतीच मर्यादित न राहता देशभरच्या लष्करात पसरली. युनायटेड स्टेट्‌स आणि अंकल सॅम या दोन्हीची आद्याक्षरं ‘यू.एस’ ही एकमेकांना इतकी फिट्ट बसत होती की, अमेरिकन सैनिक थट्टेने स्वत:ला ‘अंकल सॅमची माणसं’ म्हणवून घेऊ लागले. हळूहळू ही लोकप्रियता वाढतच गेली आणि १८२० साली अंकल सॅमचं पहिलं व्यंगचित्र वृत्तपत्रात प्रकटलं. हे व्यंगचित्र सॅमसारखंच होतं. म्हणजे गोबर्‍या गालांचा, सफावट दाढी-मिशीचा,उंच, काळी टोपी घातलेला सॅमत्यात दाखविलेला होता. प्रत्यक्षात सॅम विल्सन तसाच होता. पुढे मात्र, अंकल सॅमच्या व्यंगचित्रात बदल होत गेले. प्रत्येक व्यंगचित्रकाराने आपापल्या प्रतिभेने त्याच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकली. ऍण्ड्रू जॅक्सन या अध्यक्षांच्या कारकिर्दीत अंकल सॅमची हॅट लाल रंगाची करण्यात आली. अब्राहम लिंकनच्या कारकिर्दीत त्याची भुरभुरती दाढी, टोकदार नाक, सफाचट मिशा ही वैशिष्ट्यं अंकल सॅमला बहाल करण्यात आली.

अंकल सॅमचं अत्यंत गाजलेलं रेखाचित्र म्हणजे पहिल्या महायुद्ध काळातलं. करारी डोळ्यांचा अंकल सॅम बघणार्‍यांवर बोट राखून म्हणतो आहे, ‘‘मला तू हवा आहेस लष्करासाठी.’’ युद्धकाळात या रेखाचित्राचं भित्तीपत्रक बनविण्यात आलं. ते इतकं लोकप्रिय ठरलं की, ४० लाख भित्तीपत्रक विकत घेतली गेली. जेम्स मॉटगोमेरी फ्लॅग नावाच्या चित्रकाराने रंगविलेल्या या चित्राची मूळ संकल्पनाच मात्र ब्रिटिश होती. ब्रिटनचा युद्धमंत्री लॉर्ड किंमनेर याचं अगदी असंच भित्तीपत्रक इंग्लंडमध्ये कमालीचं लोकप्रिय आणि परिणामकारक ठरलं होतं. जेम्स फ्लॅगने तिच कल्पना वापरली होती, असो.

 

मूळ अंकल सॅम किंवा सॅम विल्सन हा नंतर राजकारणातही उतरला. १८१२ सालचं युद्ध संपल्यावर अंकल सॅमने आपल्या देशबांधवांना उद्देशून एक जाहीर निवेदन केलं होतं. त्याचे शब्द होते, ‘‘आपण अमेरिकांनी आता घेणं-मिळविणं याचबरोबर काहीतरी द्यायला तरी शिकलं पाहिजे.’’ ३१ जुलै, १८५४ रोजी अंकल सॅम वयाच्या ८८ व्या   वर्षी मरण पावला.

 

काय योगायोग असेल तो असो. अलीकडच्या काळातले अमेरिकेचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणाची सुरुवात अंकल सॅमच्या भाषणासारखीच होती. केनेडी म्हणाले होते, ‘‘तुम्ही देशासाठी काय करणार आहात ते सांगा.’’ पुढे जॉन केनेडींच्या कारकिर्दीतच अमेरिकन संसदेने अंकल सॅम आणि युनायटेड स्टेट्‌स यांच्यातील अनुबंधाला अधिकृत मान्यता दिली. संसदेच्या ठरावातले शब्द आहेत- ‘‘अमेरिकन राष्ट्राचं प्रतीक असलेल्या अंकल सॅमचा जनक, न्यूयॉर्क प्रांतातील ट्रॉयचा रहिवासी अंकल सॅम विल्सन याला हे सभागृह अभिवादन करीत आहे.’’

 

- मल्हार कृष्ण गोखले