धड इथे अन् मुंडकं तिथे
 महा त भा  16-Jun-2017


 

दीडशे-पावणे दोनशे वर्षांपूर्वी अनेक पाश्चात्त्य पुरातत्त्व शास्त्रज्ञ इजिप्तमध्ये जोमाने उत्खनन कार्य करण्यात गुंतले होते. अतिप्राचीन अशा इजिप्शियन संस्कृतीचे अवशेष गोळा करून ज्ञानाचं एक नवीन क्षेत्र खुलं करण्याची त्यांची उत्कंठा लागली होती. काय ही ज्ञानपिपासा! खरी गोष्ट अशी होती की, या पुरातत्त्वज्ञांना ज्ञानापेक्षा सोन्याची ओढ जास्त होती. प्राचीन इजिप्शियन लोक राजे-राण्यांच्या मृतदेहांबरोबर सोन्या-चांदीच्या जडजवाहिराच्या असंख्य मौल्यवान वस्तू पिरॅमिडमध्ये पुरून टाकत असतं. या गोष्टीचा वास आल्याबरोबर पुरातत्त्वज्ञांची टोळधाड इजिप्तवर कोसळली. यात ब्रिटिश अर्थातच आघाडीवर होते. इजिप्तमधले अनेक पिरॅमिड उघडून त्यांनी भरपूर सोन लुटलं. सोन्यानंतर त्यांची नजर कलावस्तूंवर पडली. त्याही लांबविण्यात आल्या. तुतन खामेनच्या पिरॅमिडने मात्र या तज्ज्ञ चोरांना चांगलाच हिसका दाखविला. तुतन खामेनचा पिरॅमिड उघडण्यात सहभागी असलेला एकूण एक पुरातत्त्वज्ञ अंतरा अंतराने मृत्युमुखी पडत गेला. हे अचानक मृत्यू का आणि कसे घडले, याचं रहस्य आजदेखील उलगडलेलं नाही, पण तो वेगळा विषय झाला.

 

चार्ल्स निकल्सन नावाचा पुरातत्त्वज्ञ सन १८५० साली ऑस्ट्रेलियाला गेला. १८६० साली त्याने आपला प्राचीन वस्तूंचा सगळा संग्रह सिडनी विद्यापीठाला दान केला. विद्यापीठाने त्याचं उत्कृष्ट संग्रहालय बनविलं. निकल्सनच्या या संग्रहात शीर नसलेल्या एका देवतेची मूर्ती होती. ज्वालामुखीच्या दगडाची, काळी कुळकुळीत, सुंदर घडणीची ही मूर्ती इजिप्शियन बनावटीची आहे. हे संग्रहालय तज्ज्ञांनी निश्चित केलं, पण तिचं मुंडक कसं असेल, कुठे असेल हे मात्र कुणीच सांगू शकत नव्हतं.

 

इतकं इजिप्तमध्ये वेगळंच नाटक घडत होतं. इजिप्त स्वतंत्र झाला. त्याची राजधानी अलेक्झांड्रियाहून कैरोला आली. इजिप्तच्या प्राचीन वारशाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं. कैरोत उत्कृष्ट वस्तुसंग्रहालय उभं राहिलं. इजिप्तचे पिरॅमिड राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित झाले. प्राचीन कलावस्तूंचं जतन नीटपणे सुरू झालं आणि तज्ज्ञांना हॅथोर या प्राचीन देवतेचं एक मुंडकं सापडलं. त्याचं धड कुठे सापडेना... ते कसं असेल याचा अंदाजही येईना. तात्पर्य, गेली जवळपास दीडशे वर्षे ती बिचारी हॅथोर देवता मुंडकं कैरोत आणि धड सिडनीत अशा अवस्थेत होती.

 

ही गोष्ट अचानकपणे लक्षात आली. शिकागो विद्यापीठातले इजिप्त विषयक तज्ज्ञ रे जॉन्सन यांच्या. कैरो आणि सिडनी संग्रहालयाच्या प्राचीन इजिप्शियन कलावस्तूंची चित्र पाहत असताना त्यांच्या डोक्यात ही कल्पना तडकली. मग त्यांनी दोन्ही संग्रहालयांच्या अधिकार्‍यांकडून धड आणि मुंडक्याची मोजमाप मागविली. त्यावरून प्रतिकृती करून प्रात्यक्षिक केल्यावर धडावर मुंडकं फिट्ट बसलं.

मग जॉन्सन यांच्या पुढाकाराने इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांतले तज्ज्ञ एकमेकांना भेटले आणि या समस्येवर मोठा अभिनव तोडगा निघाला. इजिप्तने मुंडक्याची हुबेहूब कांस्य प्रतिकृती करून ऑस्ट्रेलियाला भेट म्हणून द्यायची आणि ऑस्ट्रेलियाने धडाची हुबेहूब कांस्य प्रतिकृती बनवून इजिप्तला द्यायची.

 

कैरो संग्रहालयाचे संचालक डॉ. मोहंमद सालेह आणि सिडनी संग्रहालयाच्या संचालक ज्युडिच किन्नेरा यांनी नुकतीच मुंडक आणि धड यांच्या प्रतिकृतींची अदलाबदल केली, अशा प्रकारे कैरो व सिडनी दोन्ही ठिकाणी आता हॅथोर देवतेची मूर्ती सलग स्वरूपात उभी राहिली.

 

- मल्हार कृष्ण गोखले