Trailer Launched : ‘इंदु सरकार’ने इंदिरा गांधीच्या आणीबाणीवर टिका केलीये का?
 महा त भा  16-Jun-2017


सरधोपट कथांना पटकथेमध्ये बांधून त्याचा एक छान मसालापट बनवायचा या बॉलिवूडच्या रटाळवाण्या फॉर्म्युलाला तडा देणारा मधुर भांडारकर नावाचा एक चांगला दिग्दर्शक काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला. याच मधुरचा ‘इंदु सरकार’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. ‘इंदु सरकार’चा ट्रेलर आज मधुर भांडारकरने ट्विटरवरून लाँच केला आहे. मधुरच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपट देखील एक उत्तम कलाकृती आपल्यासमोर सादर करेल असा विश्‍वास हा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. अजून तुम्ही हा ट्रेलर बघितला नसल्यास तो आवश्य पाहा. ट्रेलरमधील काही संवादातून आणीबाणीवर टिका करण्यात आल्याचे लक्षात येते, त्यामुळे पुढील काळात या चित्रपटावरून वाद निर्माण होतील की काय अशी शंका वाटते.

Embeded Object

1975 साली इंदिरा गांधीचं सरकार असताना त्यांनी पुकारलेली आणीबाणी आणि व्यवस्थेविरूद्ध एका सामान्य स्त्रीने दिलेला लढा अशी या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असल्याचेही बोलले जाते. यामध्ये नील नितीन मुकेश, क्रिती कुल्हारी, अनुपम खेर व सुप्रिया विनोद मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. क्रितीच्या व्यक्तिरेखेस एक वेगळीच ट्रीटमेंट दिली असल्याचे व नील अगदी संजय गांधीच्या भूमिकेत चपखल बसला असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. अनुपम खेर ने याआधीही अशा भूमिका साकारल्या असल्याने त्याच्या व्यक्तिरेखेत फारसे वेगळेपण जाणवत नाही.


‘इर्मजन्सी मैं इमोशन नहीं, मेरे ऑर्डर चलतें हैं’, ‘भारत के एक बेटी ने देश को बंदी बनाया है’, ‘तुम वो बेटी बनो जो देश को मुक्ती का मार्ग दिखा सखे...’, ‘इस कुरूक्षेत्र मैं हात कापेंगे तो नही? अर्जुन के इरादे हिल सकते है, घायल द्रोपदी के नही!’, ‘सरकारे चॅलेंजेस से नही, चाबुक से चलती है!’ असे जबरदस्त संवाद ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळतात. संजय चहल यांनी चित्रपटाची कथा लिहीली आहे तर अन्नु मलिक व बप्पी लहरी यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.


चांदनी बार, हिरॉईन, फॅशन, सत्ता, कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, पेज 3 यांसारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट आजपर्यंत मधुर भांडारकरने आपल्याला दिले आहेत. त्यामुळे साहजिकच इंदु सरकारकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, आता या अपेक्षांची पूर्ती हा चित्रपट करणार की नाही याचं उत्तर 28 जुलैलाच मिळेल.