४३ वर्षीय 'ब्रेनडेड' व्यक्तीने दिले ९ लोकांना जीवनदान
 महा त भा  15-Jun-2017अवयवदान हे सर्व दानांपेक्षाही मोठे समजले जाते. यामुळे एका व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. अशीच एक घटना घडली आहे बंगळुरु येथे. बंगळुरु येथील सेल्वाराज या ४३ वर्षीय 'ब्रेनडेड' व्यक्तीने अवयवदान करुन ९ लोकांना जीवनदान दिले आहे.

सेल्वाराजला अपघात झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भीषण अपघातात डोक्याला मार लागल्याने सेल्वाराजला अंतर्स्राव झाल्याने त्याने उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले आणि, डॉक्टरांनी त्याला 'ब्रेनडेड' घोषित केले. त्यानंतर अखेर त्याचा मृत्यु झाला. सेल्वाराजच्या परिवाराने पुढाकार घेवून अवयवदान करायचे ठरवले. आणि त्यामुळे ९ नागरिकांना जीवनदान मिळाले.

डॉक्टरांच्या एका संघाने सेल्वाराजच्या दोन्ही मूत्रपिंड, यकृत, हृदय, डोळे, फुफ्फुसं, त्वचा आणि हाडं वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवली आहेत. ज्यापैकी एक मूत्रपिंड केएमसीएच रुग्णालयात, हृदय आणि फुफ्फुसं चेन्नई येथील रुग्णालयात, आणखी एक मूत्रपिंड एसपीटी रुग्णालयात, डोळे अरविंद आय हॉस्पिटल येथे तर त्वचा आणि हाडं कोएंबतूर येथील गंगा रुग्णालयात पाठविण्यात आली आहेत. त्याच्या अवयव दानामुळे ९ नागरिकांना नवीन जीवन मिळाले आहे.
सेल्वाराजच्या अवयवदानाच्या निर्णयाची प्रशंसा करत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी, "अवयवदान करणे एक नैतिक आणि परोपकारी कार्य आहे, यामुळे आपण आपल्या जीवनाच्या शेवटाना कुणाच्या तरी जीवनाची सुरुवात करु शकतो." अशा भावना व्यक्त केल्या आहेत.