चॅम्पियन्स ट्रॉफी : उपांत्य फेरीत भारताचा आज बांग्लादेशबरोबर सामना
 महा त भा  15-Jun-2017आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीतील आजचा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. लंडन येथील एजबेस्टन मैदानावर हा सामना खेळवला जाणार असून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पहायला मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

त्याच बरोबर टीम इंडियाचा एकूण परफॉर्मन्स पाहता देखील भारताचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. भारताचा संघ कर्णधार विराट कोहली याच्या तर बांग्लादेशचा संघ मुशरफ मोर्ताझा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यामुळे आजच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीच्या गुणतालिकेत भारत ग्रुप बी संघात ४ गुण मिळवून अव्वल स्थानी आहे. तर बांग्लादेश ग्रुप ए संघात ३ गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आहे.

काल पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकने इंग्लंडवर आठ गडी राखत दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होत आहे, या दोन संघांपैकी आजच्या सामन्यात जो जिंकेल त्याला अंतिम सामन्यात पाकबरोबर दोन हात करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत तरी भारत मजबूत स्थितीत दिसत असून उपांत्य फेरीतील सामन्यात भारत जिकल्यास भारत-पाक अशी लढत दिसू शकेल.

 दरम्यान,  भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग हा आज त्याचा ३०० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे भारतीयांसाठी या सामन्याला विशेष महत्व आले आहे.