अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाकिस्तानात गळचेपी
 महा त भा  15-Jun-2017

प्रेषितावर केलेल्या आक्षेपार्ह्य लिखाणामुळे तरुणाला मृत्युदंड 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाकिस्तान सरकार कडून कायद्याच्या कुबड्या घेऊन गळचेपी करण्यात आली आहे. ३० वर्षीय तैमुर रझा या तरुणाने सोशल मिडियात केलेल्या पोस्टमुळे दहशतवाद विरोधी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोशल मिडीयामध्ये पोस्ट केल्यामुळे फाशीची शिक्षा मिळालेला तो पहिलाच व्यक्ती ठरला आहे.

तैमुर रझा याने आपल्या फेसबुकवर इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आक्षेप घेणारी एक पोस्ट टाकली होती. परंतु इस्लामी कट्टरवादी असलेल्या पाकिस्तानला ते मान्य झाले नाही, त्यामुळेच न्यायाच्या कुबड्या घेत त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत त्याला मृत्युदंड ठोठावला आहे.

पाकिस्तानमध्ये इस्लामचा, अथवा प्रेषिताचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा निर्वाळा न्यायालयातर्फे देण्यात आला आहे. तैमुर रझाने केलेल्या पोस्टनंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथून दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईल फोनमध्ये ते लिखाण पोलिसांना आढळून आले. तेथे तुरुंगात त्याला डांबून त्याच्यावर खटला भरवण्यात आला.

पाकिस्तान सरकाच्या या दडपशाही विरोधात तेथील मानवतावादींनी मोर्चा काढला, तसेच पाकिस्तान सरकारची कठोर शब्दात निंदा केली. परंतु पाकिस्तान सारख्या कट्टरपंथीय देशात याला जास्त थारा मिळाला नाही. पाकिस्तानच्या या कारवाईमुळे जगभर त्यांचा निषेध करण्यात येत आहे. दहशतवाद विरोधी पथक दहशतवाद दडपण्यासाठी न करता व्यक्ती स्वातंत्र्य दडपण्यासाठी वापर करणाऱ्या पाकिस्तानला मात्र याचा तिळमात्र फरक जाणवत नाही.