नाद बागेश्री- माहेरची बाग
 महा त भा  15-Jun-2017

 


 

"वाटण्या कधी करणार आहेस ? " माझा आईला फोन वरून थेट प्रश्न ! आई भांबावली . " कसल्या ग  ? जे आहे ते तुमच्या तिघांचाच आहे.!"  आईचा सूर बदलला तशी मी चेष्टा थांबवली. "अगं आंब्याच्या वाटण्या ग !"  आईला हसू आवरेना ......

 

माझ्या चिंचवड मधल्या माहेरच्या अंगणातलं एव्हढस आंब्याचे झाड ! पण दीडशे दोनशे आंब्याने लगडलं होतं. मी पुण्यातून त्यावर लक्ष ठेवून होते. झाडावरून आंबे उतरवले आहेत कळल्यावर मी चिंचवड मध्ये अवतीर्ण !

"अगं अढी घातलीय कालच ... पिकायचेत अजून ....  या आईच्या वाक्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून माझा वाटा उचलला आणि पिशवीत भरला. अढी काय माझ्या घरातही घालता येते ! मोठ्या भावाला पण जरा लाडी गोडी लावून त्याच्याही वाटचे थोडे आंबे मिळवले. आमच्या बागेतल्या या उत्पन्नाचा(!)  म्हणजे आंबे, नारळ, सुपारी, कडीपत्ता, अळू, लिंबे, पुदिना, पपई, जांभूळ यातला वाटा मी कधीच सोडत नाही. या बाबतीत तडजोड नाही,!

 

वडील निवृत्त झाल्यावर आम्ही चिंचवडला राहायला आलो तेव्हा घरापेक्षा अंगण आणि बाग हेच मोठ आकर्षण होते. शेजार पण उत्तम मिळाला. त्यांनी तर मधलं तारांचे कुंपण काढून टाकलं. मग काय त्यांची आणि आमची अशी मिळून मोठीच बाग झाली. केव्हाही उडी मारून त्यांच्या बागेत जावं आणि आपल्याला हवं ते घेऊन यावं. एकमेकांकडे नसलेल्या फुलांची देवाण घेवाण तर रोजचीच!

 

निवृत्त झाल्यावर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न वडिलांना कधी पडलाच नाही. प्रचंड वाचन, लिखाण आणि बागकाम या तीन व्यसनात त्यांचे दिवसाचे तीन प्रहर कसे जातात कळतही नाही. त्यांच्या बरोबरच त्यांच्या तिन्ही नातवंडांनी बागकाम फारच एन्जॉय केलं, मुख्य म्हणजे आजोबाच मातीमध्ये  बसलेत; त्यांनी मातीत हात घातलाय आणि त्यांना कोणीच ओरडत नाहीये हीच एक त्यांच्यासाठी गमतीची गोष्ट होती. बागेत काम करणं आनंदाचं आणि तेव्हढच दमवणार असत हे त्या मातीत हात घातल्याशिवाय समजत नाही. बाग अगदी लळा लावते. निर्मितीचा आनंद देते. लहानपणापासून ही सवय लागली तर निर्माण करणारे हात विद्धवंस करायला धजावणार नाहीत.

 

 

सकाळी उठल्यावर एकदा बागेकडंच दार उघडलं की दुपारी झोपताना ते थोडा वेळ बंद आणि परत मग रात्री ११ ला बंद ! घरात असणाऱ्या प्रत्येकाचा रिकामा वेळ बागेतच ! चहा घेत आमचा गप्पांचा  फड तिथेच रंगतो. चहा संपल्यावर परत आत जाऊन करायला तिथून उठणेही जीवावर येते.

 

स्वतःची बाग असणे किंवा छोटेसे terrace गार्डन असण्याचे महत्व पर्यावरण, आपलं आरोग्य, सामाजिक बांधिलकी या आणि अश्या अनेक दृष्टिकोनातून वादातीत आहे. पण मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर बागेचं महत्व अनन्यसाधारण आहे. माझी एक मैत्रीण रोज सकाळी उठल्यावर तिच्याकडे असलेल्या सगळ्या फुलझाडांवरून अगदी मायेने हात फिरवते. उगीच नाही तिच्याकडची झाडं प्रसन्न आणि टवटवीत दिसत!! तिच्याही दिवसाची सुरवात मग एकदम झकास होते.

 

झेन गार्डन सारखी संकल्पना अस्तित्वात येण्याचं कारणही हेच असावं.  आपल्याकडे नाहीत अशी गार्डन्स फारशी ! पण कोकणातल्या वाड्या काय कमी आहेत? आठवून पहा बरं अश्या गर्द झाडांच्या सावलीत आपली काय मनस्थिती असते? आपल्याभोवती अक्षरशः मायेची मिठी पडल्यासारखं वाटत राहत. आणि तेच तिथून शहरात परतताना दूध उतू जाताना वर वर यावे  तसा ताण वाढत जातो. हा ताण नीटपणे हाताळायचा असेल तर प्रत्येकाने जमेल तसा जमेल तेव्हढा आपल्या काळजाचा  हा हिरवा तुकडा जपायला हवा.

- अनुजा जोगळेकर