विजय माल्यावर आज लंडन न्यायालयात सुनावणी
 महा त भा  13-Jun-2017


भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर आज लंडनमधील न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. भारत सरकारकडून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटेनकडे करण्यात आलेल्या अर्जावर विचार करून माल्यासंबंधी सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


बँकांना कोट्यावधींचा गंडा घालून गेलेल्या माल्याला भारताच्या स्वाधीन केले जावे, यासाठी भारत सरकारकडून गेल्या वर्षी ब्रिटेनकडे अर्ज करण्यात आला होता. याला ब्रिटेनकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यासंबंधीचा सर्व प्रक्रियांची सुरुवात देखील करण्यात आली असल्याचे ब्रिटेनकडून सांगण्यात आले होते. यानंतर भारताने केलेला अर्ज आणि पाठवलेले पुराव्या यासर्व गोष्टींचा आढावा घेऊन माल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी न्यायालयाकडून निकाल देण्यात येईल.


विजय माल्याने व्यवसायाच्या नावावर भारतातील बँकांकडून ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे सर्व थक्कीत कर्ज तसेच ठेऊन त्याने इंग्लंडला पलायन केले होते. त्यानंतर सीबीआय आणि इडीने केलेल्या कारवाईत माल्याची भारतातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच माल्याला फरार म्हणून घोषित करत त्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आजचा निकाल भारताच्या बाजूने लागल्यास पुढे काय होणार याची देखील उत्सुकता सर्वाना लागली आहे.