म्युनिख येथील रेल्वे स्टेशनवर गोळीबार
 महा त भा  13-Jun-2017


जर्मनीमधील म्युनिख शहरातील एका भुयारी रेल्वे स्थानकावर आज एका माथेफिरूने अंधाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारमध्ये काही नागरिकांसह एक महिला पोलीस देखील गंभीररीत्या जखमी झाले आहे. दरम्यान या हल्लेखोराला म्युनिख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


आज दुपारी हा माथेफिरू म्युनिक शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या एका भुयारी रेल्वे स्थानकावर हातात बंदूक घेऊन आला होता. त्यानंतर त्याने स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत असलेल्या प्रवाशांवर अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून स्टेशनवरील सर्व नागरिकांनी स्टेशनच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली. नागरिकांचा गदारोळ तसेच गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर थोडावेळ चकमक झाल्यानंतर पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले. तसेच काही कालावधीसाठी रेल्वे स्टेशन पोलिसांकडून बंद करण्यात आले आहे.


दरम्यान युरोपात होर असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्यामुळे काही जणांकडून हा दहशतवादी हल्ला असल्याचे बोलले जात आहे. परंतु पोलिसांकडून हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हल्ला करणारा माथेफिरू हा मनोरुग्ण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.