बांग्लादेशात भूस्खालनामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू
 महा त भा  13-Jun-2017


 

बांग्लादेशात काल रात्री दोन ठिकाणी झालेल्या भूस्खलनामध्ये ३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून देशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल एकाच दिवसात दोन ठिकाणी भूस्खलन झाले. दरम्यान बांग्लादेश प्रशासनाकडून नागरिकांसाठी मदतकार्य देखील सुरु करण्यात आले असून २ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव दलाकडून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.


बांग्लादेशातील बंदरबन येथील कालाघाट आणि लेमुजीरी या दोन्ही ठिकाणी काल या घटना घडल्या. देशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री या दोन्ही ठिकाणी लागोपाठ भूस्खलन झाले. यातील कालाघाट येथे भूस्खलनात १० जण ठार झाले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. तर लेमुजीरी येथे एकाच गावातील १९ नागरिक भूस्खलनात सापडून ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. तसेच डोंगर आणि टेकड्यांशेजारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचे इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


दरम्यान देशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यां दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे.